जिल्हा मध्यवर्ती बँकेत रंगतोय पत्त्यांचा डाव

By Admin | Updated: December 2, 2015 02:32 IST2015-12-02T02:32:45+5:302015-12-02T02:32:45+5:30

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्थानिक पाचकंदील चौक स्थित मुख्यालयात रात्री उशिरापर्यंत पत्त्यांचा डाव रंगतो.

The colorful outfit of the district central bank | जिल्हा मध्यवर्ती बँकेत रंगतोय पत्त्यांचा डाव

जिल्हा मध्यवर्ती बँकेत रंगतोय पत्त्यांचा डाव

नियंत्रण ठेवणारेच सहभागी : आलिशान वाहने ठरताहेत पुरावा
यवतमाळ : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्थानिक पाचकंदील चौक स्थित मुख्यालयात रात्री उशिरापर्यंत पत्त्यांचा डाव रंगतो. सोमवारी ३० नोव्हेंबर रोजी बैठकीनंतर हा डाव रंगला आणि यवतमाळ शहर पोलीस ठाण्याच्या परिसरात चर्चेला पेव फुटले.
जिल्हा बँकेत चालणाऱ्या गैरकारभाराच्या चर्चा आता बँकेच्या परिसरातील कॅन्टींग, हॉटेल व पानटपऱ्यांवरही रंगू लागल्या आहेत. या चर्चा आता शेजारीच असलेल्या शहर ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांपर्यंतही पोहोचल्या आहेत. साहित्य खरेदीतील घोटाळे, बांधकामातील विलंब, कर्ज वाटपातील घोळ, बँक कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनसमधील मार्जीन, खानपानावर बँकेच्या पैशातून होणारी उधळपट्टी, बँकेसाठी कागदोपत्री धावणारी संचालकांची वाहने, मात्र दरमहा न चूकता तत्काळ निघणारी त्यांची देयके असे विविध विषय बँकेसमोर नेहमीच चर्चिले जातात. त्यात आता बँकेत रंगणाऱ्या पत्त्याच्या डावाचीही भर पडली आहे.
बँकेच्या परिसरात सुरू असलेल्या चर्चेनुसार, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आता पत्त्याचे डावही रंगू लागले आहेत. या पत्त्यांसोबत हिरव्या नोटांचीही देवाण-घेवाण होते. कधीकाळी बँकेतील अ‍ॅन्टी चेंबरमध्ये रंगणारा हा डाव मध्यंतरी बँकेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या धान्य बाजार परिसरात शिप्ट झाला होता. मात्र मध्यंतरी उत्सवातील गर्दीमुळे हा डाव पुन्हा बँकेत सुरू झाला. आता तर चक्क नेहमी बैठक होणाऱ्या ठिकाणीच हा डाव खेळला जात असल्याचे चर्चिले जाते. या डावाचा पुरावा म्हणून बँकेसमोर रात्री उशिरापर्यंत उभ्या राहणाऱ्या आलिशान वाहनांकडे बोट दाखविले जाते.
सोमवारी जिल्हा बँकेत बैठक होती. त्यानंतर सर्व कर्मचारी घरी गेले, बँक बंद झाली. मात्र ज्यांनी बँकेवर नियंत्रण ठेवायचे त्यातील काही जण बँकेतच तळ ठोकून होते. अंधार पडताच त्यांनी पत्त्याचा डाव सुरू केला. रात्री उशिरापर्यंत हा डाव चालला.
बँकेच्या सर्व प्रवेशद्वारांवर सुरक्षा रक्षक असल्याने आणि प्रवेशद्वाराला कुलूप लावलेले असल्याने बाहेरील सुरक्षा यंत्रणेने या डावावर वक्रदृष्टी फिरविण्याचा धोका नसतोच. त्यामुळे डाव रंगविणारे अगदी बिनधास्त हिरव्या नोटा उधळत असतात. खेळणाऱ्यांमध्ये प्रतिष्ठीत असतात. त्यांचा खेळ मोडल्यास राजकीय दबाव येण्याची भीती पोलिसांना असावी म्हणूनच शहर पोलीस कानाशेजारी असूनही पत्त्यांच्या या डावाकडे कानाडोळा करतात.
अनेकदा हा डाव रंगात आला की, सामिश भोजनाचे डबेही तेथेच बोलविले जातात. खानपानही जागीच मिळाल्याने या डावात आणखी रंगत भरते. शेतकऱ्यांच्या या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी शेतकरी सभासदांनी आपल्याच काही सुशिक्षित निवडक बांधवांवर दिली. मात्र यातील काही बांधव स्वत:च बँकेची व पर्यायाने जिल्ह्यातील तमाम शेतकऱ्यांची इभ्रत वेशीवर टांगायला निघाले असल्याचे दिसून येते. (जिल्हा प्रतिनिधी)
गेल्या काही वर्षांपासून बँकेत हा डाव रंगतो आहे. एकदा पोलिसांना याची टीप मिळाल्याने धाड घालण्याची व्यूहरचना केली गेली होती. परंतु तत्कालीन एक बडा अधिकारी फितूर झाला, त्याने जातीसाठी माती खाल्ली आणि पोलिसांना हा डाव रंगेहात पकडण्यापासून मुकावे लागले. त्यानंतर परत कुणी हा डाव पकडण्याची तसदी घेतली नाही. पोलीस ठाण्याच्या भिंती शेजारी पत्त्याचा हा डाव खेळला जात असूनही पोलीस कारवाई करीत नाही.

Web Title: The colorful outfit of the district central bank

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.