जिल्हाधिकारी हिंदीवर बरसले, मराठीचा आग्रह
By Admin | Updated: June 21, 2015 00:05 IST2015-06-21T00:05:11+5:302015-06-21T00:05:11+5:30
आढावा बैठकीत हिंदीत उत्तरे देणाऱ्या आरोग्य विभागातील लेखा अधिकाऱ्यावर जिल्हाधिकारी चांगलेच बरसले.

जिल्हाधिकारी हिंदीवर बरसले, मराठीचा आग्रह
आढावा बैठक : बडतर्फीचे आदेश, वरिष्ठांची मध्यस्थी, आरोग्य विभागातील लेखाधिकाऱ्याचा अखेर माफीनामा
यवतमाळ : आढावा बैठकीत हिंदीत उत्तरे देणाऱ्या आरोग्य विभागातील लेखा अधिकाऱ्यावर जिल्हाधिकारी चांगलेच बरसले. मी उत्तर प्रदेशातून येऊन अस्खलित मराठी बोलू शकतो तर तुम्ही महाराष्ट्रात राहून का नाही असा जाब विचारत जिल्हाधिकाऱ्यांनी मराठीतच बोला असा आग्रह धरला.
शुक्रवारी आरोग्य विभागाच्या नियामक समितीची बैठक जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. या बैठकीमध्ये जिल्हाधिकारी मराठीमध्ये अधिकाऱ्यांना प्रश्न विचारीत होते, मात्र एक कंत्राटी लेखाधिकारी वारंवार हिंदीतून प्रश्नांचे उत्तर देत होते. या प्रकारामुळे जिल्हाधिकारी जाम संतापले. तुम्ही हिंदीत का बोलत आहात, अशी विचारणा त्यांनी केली. त्यावर ‘मला मराठी तेवढी चांगली जमत नाही’, असे उत्तर त्या अधिकाऱ्याने दिले. ते ऐकून तर जिल्हाधिकाऱ्यांचा पारा आणखीच भडकला. मी उत्तर प्रदेशातील असून मराठी बोलू शकतो तर तुम्ही स्थानिक असून मराठी का बोलू शकत नाही, असा सवाल त्यांनी विचारला. तुम्हाला मराठी येत नाही, त्यामुळे महाराष्ट्रात नोकरी करण्यास तुम्ही पात्र नाहीत, असे स्पष्ट करीत त्यांच्या बडतर्फीचे आदेश जारी करण्याचे निर्देश दिले. अखेर या अधिकाऱ्याने हातपाय पडून आपली नोकरी वाचविली. त्यांच्या वरिष्ठांनीही त्यात मध्यस्थी केली. जिल्हाधिकाऱ्यांचे हे मराठी प्रेम पाहून बैठकीतील तमाम अधिकारी अवाक् राहिले. (जिल्हा प्रतिनिधी)
मी उत्तर प्रदेशातील असून मराठी बोलू शकतो तर तुम्ही स्थानिक असून मराठी का बोलू शकत नाही ?