जिल्हाधिकारी धडकले प्राधिकरणात

By Admin | Updated: April 30, 2015 00:04 IST2015-04-30T00:04:27+5:302015-04-30T00:04:27+5:30

शहरासह लगतच्या ग्रामपंचायत क्षेत्रातील सुमारे चार लाख नागरिकांना शुद्ध पाणी पुरविण्यात हयगय करणाऱ्या....

Collector Stalker Authority | जिल्हाधिकारी धडकले प्राधिकरणात

जिल्हाधिकारी धडकले प्राधिकरणात

अधिकाऱ्यांची झाडाझडती : घाणीच्या विळख्यातील पाण्याच्या वॉलचे प्रत्यक्ष निरीक्षण
यवतमाळ : शहरासह लगतच्या ग्रामपंचायत क्षेत्रातील सुमारे चार लाख नागरिकांना शुद्ध पाणी पुरविण्यात हयगय करणाऱ्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल यांनी प्रत्यक्ष प्राधिकरण कार्यालय गाठून झाडाझडती घेतली. ‘लोकमत’ने प्रकाशित केलेल्या वृत्ताची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी परिस्थितीची पाहणी केली. पाण्याच्या वॉल्वजवळील गटारं पाहून त्यांनी आश्चर्य व्यक्त करतानाच तत्काळ स्वच्छ करा अशा सूचना केल्या.
यवतमाळ शहरासह लगतच्या ग्रामपंचायत क्षेत्राला जीवन प्राधिकरणातर्फे पाणी पुरवठा केला जातो. यासाठी वॉल्व गोदणी रोडवर असलेल्या कार्यालयाजवळ आहेत. सदर वॉल्व सांडपाण्याच्या गटारात आहे. ही बाब ‘लोकमत’ने उजेडात आणली. याची दखल घेत जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल बुधवारी दुपारी ५ वाजता या कार्यालयावर धडकले. त्यांनी परिस्थितीची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली.
उपअभियंता शेषराव दारव्हेकर यांना यासंदर्भात विचारणा केली. या ठिकाणची स्वच्छता कोण करते, हा भाग इतका अस्वच्छ कसा, शहराला पाणी पुरवठा करणारी टाकी किती वर्ष जुनी आहे, त्याची आयुष्यमर्यादा किती याबाबतची विचारणा दारव्हेकर यांना करण्यात आली. कार्यालयाच्या प्रवेशव्दारावरच असलेल्या सांडपाण्याविषयीसुद्धा त्यांनी चिंता व्यक्त केली.
यासोबतच जीवन प्राधिकरण कार्यालयातील कक्षांची पाहणी त्यांनी केली. याठिकाणच्या दुर्गंधीने ते संतापले.
शौचालयाची साफसफाई होते की नाही अशी विचारणा केली. भूजल सर्वेक्षण कार्यालयातही त्यांना असाच अनुभव आला. वरिष्ठ भूवैज्ञानिक वालदे यांना कार्यालयाच्या स्वच्छता ठेवण्याच्या सूचना दिल्या.
यावेळी उपअभियंता शेषराव दारव्हेकर यांनी ड्रेनेज सिस्टीम बिघाडल्याने पाणी साचल्याचे सांगितले. निधी तत्काळ उपलब्ध झाल्यास जूनपर्यंत हा प्रश्न निकाली निघेल, असे मत त्यांनी मांडले. संपूर्ण परिसर यापूढे स्वच्छ असेल अशी ग्वाही त्यांनी दिली. (शहर वार्ताहर)

Web Title: Collector Stalker Authority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.