कलेक्टर साहेब, आता तुमचाच आधार !

By Admin | Updated: August 5, 2015 00:18 IST2015-08-05T00:18:32+5:302015-08-05T00:18:32+5:30

निराधारांचा टाहो : महागाव तालुक्यातील शेकडो वृद्ध मानधनापासून वंचित

Collector, now your base! | कलेक्टर साहेब, आता तुमचाच आधार !

कलेक्टर साहेब, आता तुमचाच आधार !

फुलसावंगी : वृद्धांसाठी व निराधारांसाठी आधारवड ठरलेली संजय गांधी निराधार, श्रावणबाळ ही योजना लाचखोर कर्मचारी व दलालांच्या विळख्यात सापडली आहे. त्यामुळे महागाव तालुक्यातील शेकडो वृद्ध निराधार मानधनापासून वंचित आहे. ते गेल्या कित्येक वर्षांपासून तहसील कार्यालय व बँकेचे उंबरठे झिजवत आहे. कर्मचाऱ्यांनी निराधारांची अक्षरश: चेष्टा मांडली आहे. त्यामुळे निराधारांना जिल्हाधिकारीच आपल्यासाठी काही तरी ठोस निर्णय घेतील, अशी आशा वाटत आहे. सोमवारी महागाव तहसील कार्यालयातील संजय गांधी निराधार व अर्थसहाय्य विभागात फेरफटका मारला असता अनेक वृद्ध, निराधार महिला हतबल होवून बसल्याचे आढळले. हातात बँकेचे पासबूक घेऊन माझा पगार कधी होतो हो साहेब, असा प्रश्न प्रत्येकाला विचारित होत्या. तालुक्यातील मोरथ येथील लिलाबाई मल्लिकार्जुन दंडगे या ७५ वर्षांच्या वृद्ध निराधार महिलेला मागील दहा वर्षांपासून श्रावणबाळ योजनेतून मानधन मिळत होते. कुटुंबात एकटीच असलेली ही वृद्ध महिला या मानधनावरच स्वत:चा उदरनिर्वाह करीत होती. परंतु गेल्या सहा महिन्यांपूर्वी संबंधित विभागातील एका लिपिकाने बेजबाबदारपणे दंडगेऐवजी दगडे असे आडनाव करून सवना सेंट्रल बँकेत त्या महिलेचे मानधन पाठविले होते. आडनावात बदल झाल्याने बँकेतील कर्मचारी त्या वृद्ध महिलेला गेल्या चार महिन्यांपासून अपमानित करून तहसील कार्यालयात पाठवित आहेत. तर तहसील कार्यालयातील संबंधित विभागातील कोणताही कर्मचारी त्या वृद्ध महिलेची तक्रार ऐकून घेण्यास तयार नाहीत. हतबल झालेली ती वृद्ध निराधार महिला तहसील कार्यालयासमोरील झाडाचा आधार घेऊन प्रतीक्षेत बसली आहे. हातात बँकेचे पासबूक घेऊन जवळून जाणाऱ्या-येणाऱ्या प्रत्येकाचे चेहरे ती न्याहाळत आहे. यावेळी तालुक्यातील चंद्रकला आढाव, सारजाबाई ढगे, रुख्मिणाबाई पहूळकर, पार्वती राऊत, सुभद्रा गोंदाडे, सखाराम घोडे यांच्यासह अनेक वृद्ध निराधार बँकेचे पासबूक घेऊन तहसील कार्यालयात येरझारा मारत होते. परंतु मानधन का बंद झाले, हे सांगण्यासाठी तहसील कार्यालयातील कोणताही अधिकारी किंवा कर्मचारी सौजन्य दाखवायला तयार नाही. तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजविणे व सायंकाळी घराकडे परत जाणे ही या निराधारांची नित्याचीच बाब झाली आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून निराधार योजनेतील मानधन बंद झाले. मजुरी करण्यापुरतेही या निराधारांच्या शरीरात त्राण उरलेले नाही. अशा परिस्थितीत पोटाची खळगी भरावी तरी कशी असा प्रश्न अनेक वृद्ध निराधारांना सतावत आहे. आज ना उद्या आपल्या समस्या निकाली निघतील, या आशेने तहसीलमध्ये व बँकेत दररोज चकरा मारत आहे. परंतु त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कोणीही पुढाकार घेत नाही. त्यामुळे निराधार व वृद्ध महिलांच्या तोंडून एकच आर्तटाहो निघत आहे; कलेक्टर साहेब, आता तुमचाच आम्हाला आधार! (प्रतिनिधी) एका शब्दामुळे सहा महिने हेलपाटे ७५ वर्षांची वृद्ध महिला मानधनासाठी वारंवार चकरा मारत असूनही तिला मानधन तर मिळत नाहीच. पण साधी शाब्दिक सहानुभूतीही द्यायला कर्मचारी तयार नाही. लीलाबाई दंडगे या वृद्ध महिलेच्या प्रकरणात तहसीलमधील एका लिपिकाने तिचे आडनाव दगडे असे लिहून सवना सेंट्रल बँकेकडे मानधन पाठविले. या एका शब्दाच्या चुकीमुळे लीलाबाईला मानधन तर मिळाले नाहीच; मात्र सहा महिन्यांपासून बँक आणि तहसील कार्यालयाच्या वाऱ्या करणे तिच्या नशिबी आले आहे.

Web Title: Collector, now your base!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.