कलेक्टर, सीईओंची मजुरांसोबत हितगुज
By Admin | Updated: May 1, 2015 02:00 IST2015-05-01T02:00:25+5:302015-05-01T02:00:25+5:30
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत राबणाऱ्या मजुरांच्या समस्या जाणून घेण्यासाठी

कलेक्टर, सीईओंची मजुरांसोबत हितगुज
दारव्हा : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत राबणाऱ्या मजुरांच्या समस्या जाणून घेण्यासाठी एक दिवस मजुरांसोबत हा उपक्रम राबविण्यात आला. नियमाप्रमाणे वर्षातून दोनदा जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गावात जाऊन मजुरांशी हितगूज करणे अपेक्षित आहे. या अंतर्गत दारव्हा तालुक्यातील दूधगाव येथे कलेक्टर आणि सीईओंनी मजुरांशी गुरुवारी सकाळी संवाद साधला.
रोजगार हमी योजना अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासाठी विशेष जनजागृतीपर कार्यक्रमांतर्गत थेट प्रशासन प्रमुखांनीच यात पुढाकार घेतला आहे. जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी दारव्हा तालुक्यातील दूधगाव या सर्वाधिक रोहयो मजूर असलेल्या गावाची निवड केली. दारव्हा पंचायत समिती गटविकास अधिकारी राजू शिंदे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. गावात असलेल्या सर्व रोहयो मजुरांशी थेट प्रशासनातील प्रमुख अधिकाऱ्यांनी चर्चा केली. त्यांना काम करताना येणाऱ्या अडचणी, आरोग्याबाबतची विचारणा करण्यात आली.
यावेळी दूधगाव येथे आरोग्य तपासणी शिबिर, आधार कार्ड शिबिर, ग्रामपंचायतीकडून जॉबकार्ड शिबिर घेण्यात आले. एकाचवेळी मजुरांच्या अडचणी सोडविण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी नागरिकांच्या विविध समस्या व शंकांचे निरसन करण्याचा प्रयत्न झाला.
याच धर्तीवर संपूर्ण जिल्ह्यात पहिला शनिवार हा मजूर दिवस म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला, अशा सूचनाही पंचायत समिती व तहसील कार्यालयांना देण्यात आल्या आहे. प्रत्येक गावात तालुकास्तरावरचे अधिकारी जावून महिन्यातून एकदा रोहयो मजुरांशी चर्चा करणार आहे. त्यावेळी विविध स्वरूपाचे कॅम्प घेऊन अडीअडचणीही सोडविण्यात येणार आहे. दूधगाव येथील महिला सरपंचांनी लेबर बजेट जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले. (तालुका प्रतिनिधी)