थंडीचा कडाका वाढला; यवतमाळ जिल्ह्यात तुरीच्या फुलोऱ्याला आला बहर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2020 12:23 IST2020-12-09T12:23:09+5:302020-12-09T12:23:31+5:30
Yawatmal News Agriculture कार्तिक महिन्याच्या शेवटी थंडीने चांगलाच जोर पकडला आहे. त्यामुळे सध्या फुलोऱ्यात असलेली तूर चांगलीच बहरणार आहे.

थंडीचा कडाका वाढला; यवतमाळ जिल्ह्यात तुरीच्या फुलोऱ्याला आला बहर
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : कार्तिक महिन्याच्या शेवटी थंडीने चांगलाच जोर पकडला आहे. त्यामुळे सध्या फुलोऱ्यात असलेली तूर चांगलीच बहरणार आहे. गहू, हरभरा या पिकांना थंडी पोषक असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी चार वर्षांपासून निसर्गाच्या लहरीपणाची झळ सोसत आहेत. पण, यंदा रब्बी पिकांना निसर्गाने साथ दिली आहे. चांगला पाऊस झाल्याने तुरीची वाढ झपाट्याने होत आहे. सध्या तुरीचे पीक फुलोऱ्यात आहे.
गेल्या काही दिवसांत ढगाळ वातावरणाने तुरीवर किडीचा प्रादुर्भाव दिसून येत होता. पण, शेतकऱ्यांनी वेळीच उपाययोजना करून कीडनाशक फवारणी करून किडीचा बंदोबस्त केला. सिंचनाची सोय असलेले शेतकरी तुरीला पाणी देत आहेत. सध्या थंडीने जोर धरला असून त्यामुळे तुरीची वाढ चांगली होऊन फुलधारणा चांगल्या प्रकारे होत आहे.. परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे खरिपाचे पीक गेले पण रब्बी हंगामांत शेतकऱ्यांना अच्छे दिन येण्याचे चिन्ह आहेत .