युतीच्या वेळेवरील निर्णयाने गोंधळ
By Admin | Updated: October 29, 2016 00:15 IST2016-10-29T00:15:21+5:302016-10-29T00:15:21+5:30
नगरपरिषद निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याला अवघे २४ तास उरले असताना अगदी शेवटच्या घटकेला

युतीच्या वेळेवरील निर्णयाने गोंधळ
नगरपरिषद रणधुमाळी : भाजपाची साद, मात्र शिवसेनेला श्रेष्ठींच्या आदेशाची प्रतीक्षा
यवतमाळ : नगरपरिषद निवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याला अवघे २४ तास उरले असताना अगदी शेवटच्या घटकेला सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेने युतीचा प्रस्ताव पुढे आला. शेवटच्या क्षणी नेमके कोणते गणित जुळवावे अशा पेचात स्थानिक नेतृत्व अकडले आहे. भाजपाने युतीसाठी साद घातली असली तरी शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांना मात्र मातोश्रीच्या आदेशाची प्रतीक्षा आहे.
जिल्ह्यातील आठ नगरपरिषदेत भाजप-शिवसेनेने स्वबळावर लढण्याची पूर्ण तयारी केली. नगराध्यक्षासह नगरसेवक पदाचे उमेदवार निश्चित केले आहेत. कोणत्याही परिस्थितीत लढायचे या मनसुब्याने उतरलेल्या कार्यकर्त्यांना आता युती करण्यास सांगितले जात आहे.
भाजपाकडून पुसद, उमरखेड, दारव्हा, दिग्रस येथे युती करून लढण्याची साद घातली जात आहे. त्या दृष्टीने चर्चा केली जात आहे. मात्र यवतमाळ, वणी, घाटंजी, आर्णी येथे दोन्ही पक्ष कोणत्याही परिस्थितीत सोबत लढण्याच्या तयारीत आहेत. दोन्ही पक्षातील श्रेष्ठींनी पक्ष वाढीसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर झालेल्या राजकीय घडामोडीत ऐन शेवटच्या क्षणी युतीची भाषा बोलली जात आहे. प्रत्यक्षात याकडे दुर्लक्ष करून स्थानिक पातळीवरचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. नामांकन दाखल केल्यावर माघार घ्यायची नाही, असाही निश्चित उमेदवारांनी केला आहे. (कार्यालय प्रतिनिधी)