भोसावासीयांचा पुरवठा अधिकाऱ्याला घेराव

By Admin | Updated: May 9, 2014 01:34 IST2014-05-08T01:13:37+5:302014-05-09T01:34:11+5:30

साखरेचे वाटप करताना मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याची चौकशी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून बुधवारी दुपारी ११ वाजताच्या सुमारास भोसा येथील ..

Co-ordination of Bhosawasi's supply officer | भोसावासीयांचा पुरवठा अधिकाऱ्याला घेराव

भोसावासीयांचा पुरवठा अधिकाऱ्याला घेराव

यवतमाळ : साखरेचे वाटप करताना मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याची चौकशी जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांकडून सुरू आहे. याचाच एक भाग म्हणून बुधवारी दुपारी ११ वाजताच्या सुमारास भोसा येथील एका रास्त भाव दुकानाची तपासणी करण्यात आली. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांवरच नागरिकांनी रोष व्यक्त केला. साखरेचे आवंटन आणि वाटपात मोठ्या प्रमाणात घोळ झाल्याची तक्रार आयुक्त स्तरावर करण्यात आली आहे. याची चौकशी येथील जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र निफाडकर यांच्यामार्फत सुरू आहे. त्यातच भोसा येथील लक्ष्मीबाई कुंभरे यांचे रास्त भाव दुकान दुसराच व्यक्त चालवित असल्याची तक्रारही आयुक्तस्तरावर झाली होती.

त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश आयुक्तांनी जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र निफाडकर यांना दिले होते. त्यावरून बुधवारी दुपारी पुरवठा अधिकारी निफाडकर हे रास्त भाव दुकान तपासणीसाठी गेले. यावेळी त्यांनी ५८ शिधापत्रिका ताब्यात घेवून त्याची बारकाईने पाहणी केली. त्यात कुठलाही घोटाळा आढळून आला नाही. त्यानंतर लाभार्थ्यांना बोलवून त्यांचे म्हणणे जाणून घेण्यात आले. त्यामध्ये लक्ष्मीबाई कुंभरे याच सदर रास्त भाव दुकान चालवित असल्याचे लाभार्थ्यांनी ठासून सांगितले. रास्त भाव दुकान योग्यरित्या चालविले जात आहे. मात्र पुरवठा विभागाकडून या रास्त भाव दुकानाला गेल्या सहा महिन्यांपासून साखरच उपलब्ध करून दिल्या गेली नाही. त्यामुळे ते साखरेचे वाटप करणार कसे,

अशी प्रश्नांची सरबत्ती यावेळी लाभार्थ्याच्या जमावाने पुरवठा अधिकारी निफाडकर यांच्यावर केली. तेव्हा पुरवठा अधिकारी निफाडकर हे लाभार्थ्यांचे समाधान करू शकले नाही. पुरवठा विभाग आणि धान्याचा काळाबाजार करणारे व खोट्या तक्रारी करून खंडणी उकळणार्‍यांचे साटेलोटे असल्याचा आरोपही यावेळी लाभार्थ्यांनी केला. ही कारवाई दुपारी उशिरापर्यंत चालली. त्यानंतर रास्त भाव दुकानदार कुंभरे यांच्याविरुद्ध केलेल्या तक्रारीत तथ्य नसल्याचा निर्वाळा देण्यात आला. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Co-ordination of Bhosawasi's supply officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.