मारेगावात नाफेडची तूर खरेदी बंद
By Admin | Updated: March 3, 2017 02:04 IST2017-03-03T02:04:38+5:302017-03-03T02:04:38+5:30
मागीलवर्षी तुरीची डाळ २०० रूपयांवर गेली. म्हणून यंदा शेतकरी तुरीच्या पिकाकडे वळला.

मारेगावात नाफेडची तूर खरेदी बंद
बारदाणा संपला : आठ दिवसांपासून शेतकऱ्यांचा केंद्रावर मुक्काम
मारेगाव : मागीलवर्षी तुरीची डाळ २०० रूपयांवर गेली. म्हणून यंदा शेतकरी तुरीच्या पिकाकडे वळला. पण भाव कोसळल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. ही परिस्थिती लक्षात घेत नाफेड खरेदी सुरू करण्यात आली. परंतु आठ दिवसांपासून बारदाणा नसल्याचे कारण देत नाफेडने खरेदी बंद केली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची हजारो क्विंटल तूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये पडून आहे. हीच संधी साधत व्यापाऱ्याने तुरीचे भाव पाडले असून १० हजारांची तूर खासगीमध्ये साडेतीन हजार रूपयात खरेदी करीत आहे.
गेल्या वर्षी तुरीचे दर १२ हजार रूपयांच्यावर गेले होते. कापूस, सोयाबीनचे दर गेल्यावर्षी कोसळल्याने तालुक्यातील शेतकरी नगदी पीक म्हणून मोठ्या प्रमाणात तुरीकडे वळला. पावसाने साथ दिल्याने उत्पादनही समाधानकारक मिळाले. परंतु यावर्षी भाव कोसळल्याने शासनाने हमी भावाने नोफडमार्फत खरेदी सुरू केली. आधारभूत किंमत चार हजार ६२५ रूपये व ४२५ रूपये बोनस असा पाच हजार ५० रूपयांचा भाव ठरविण्यात आला. खुल्या बाजारात मात्र केवळ साडेतीन हजार भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांनी नाफेड केंद्रावर गर्दी केली.
येथील बाजार समितीमध्ये नाफेडचे खरेदी केंद्र आहे. परंतु आठ दिवस या केंद्रावर तूर खरेदी केल्यानंतर आता बारदाणा संपला म्हणून २३ फेब्रुवारीपासून हे केंद्र बंद आहे. दरम्यान शेतकऱ्यांकडे मोठ्या प्रमाणात असलेली तूर खुल्या बाजारात तुरीचे अल्प दर आणि नाफेड खरेदी बंद होण्याची भिती, यामुळे शेतकरी बैलगाड्या व इतर वाहने घेऊन आठ दिवसांपासून ३९ शेतकरी बाजार समितीच्या यार्डामध्येच मुक्कामी आहेत. आठ दिवसांपासून बारदाण येणार, असे सांगत असले तरी बारदाणा फारच अल्प येणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे केंद्रावर गोंधळ होण्याची भीती वर्तविण्यात येत आहे. (शहर प्रतिनिधी)