जिल्ह्यातील माध्यमिक शाळा बंद
By Admin | Updated: October 7, 2016 02:38 IST2016-10-07T02:37:49+5:302016-10-07T02:38:43+5:30
औरंगाबाद येथे विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांनी काढलेल्या मोर्चावर पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ गुरूवारी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांनी कडकडीत बंद पाळला.

जिल्ह्यातील माध्यमिक शाळा बंद
यवतमाळ : औरंगाबाद येथे विनाअनुदानित शाळांच्या शिक्षकांनी काढलेल्या मोर्चावर पोलिसांनी केलेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ गुरूवारी जिल्ह्यातील माध्यमिक शाळांनी कडकडीत बंद पाळला.
औरंगाबाद येथे ४ आॅक्टोबरला विनाअनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी मोर्चा काढला होता. या मोर्चात सहभागी शिक्षक व कर्मचाऱ्यांवर पोलिसांनी लाठी हल्ला केला. त्यात अनेक शिक्षक जखमी झाले. याप्रकरणी शिक्षकांविरूद्ध पोलिसांनी गुन्हेही दाखल केले. या घटनेचा निषेध म्हणून जिल्हा शिक्षण संस्था संचालक मंडळ व विविध शिक्षक संघटनांतर्फे गुरूवारी जिल्ह्यातील सर्व शाळा बंद ठेवण्यात आल्या. शहरासह जिल्ह्यातील माध्यमिक आणि इतर शाळाही गुरूवारी बंद होत्या. या बंदमध्ये सर्वच शाळांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
औरंगाबाद येथील घटनेचा निषेध म्हणून जिल्ह्यातील सर्व शाळांचे शिक्षक आजपासून काळ्या फिती लावून काम करणार आहे. तसेच मोर्चेकरी शिक्षक व कर्मचाऱ्यांवरील कारवाई मागे घेण्यात यावी, त्यांच्या न्याय मागण्यांची तत्काळ दखल घ्यावी, अशी मागणीही शिक्षक संघटनांनी केली. या मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. बंदमध्ये यवतमाळ जिल्हा मुख्याध्यापक संघटना, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटना, जिल्हा शिक्षक व कर्मचारी संघर्ष समिती, शिक्षक परिषद, शिक्षक आघाडी, डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती आदी संघटना सहभागी झाल्या होत्या.औरंगाबादप्रकरणी नेर येथे तहसील कार्यालयासमोर धरणे देण्यात आली. खासगी संस्था बंद ठेवण्यात आल्या. यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. (शहर प्रतिनिधी)