जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करा

By Admin | Updated: March 4, 2017 00:53 IST2017-03-04T00:53:52+5:302017-03-04T00:53:52+5:30

जिल्ह्यात सुरू असलेले मटका, जुगार, क्लब, क्रिकेट सट्टा, अवैध प्रवासी वाहतूक, कोंबडबाजार, अंमली पदार्थांची तस्करी,

Close illegal businesses in the district | जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करा

जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करा

एसपींचे ठाणेदारांना फर्मान : धाडसत्र राबविण्याचे निर्देश
यवतमाळ : जिल्ह्यात सुरू असलेले मटका, जुगार, क्लब, क्रिकेट सट्टा, अवैध प्रवासी वाहतूक, कोंबडबाजार, अंमली पदार्थांची तस्करी, प्रतिबंधित गुटखा, अवैध दारू या सारखे तमाम अवैध धंदे बंद करा, असे फर्मान जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी गुरुवारी सर्व ठाणेदारांना सोडले आहे. या धंद्यांवर धाडसत्र राबविण्याच्या सूचनाही केल्या आहेत.
एम. राज कुमार यांनी यवतमाळच्या जिल्हा पोलीस अधीक्षक पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर महिनाभर येथील एकूणच भौगोलिक, राजकीय, सामाजिक स्थितीचा अभ्यास केला. गेली महिनाभर एसपींचे अवैध धंद्यांबाबत धोरण काय असेल याची चर्चा पोलीस दलात होती. एसपींच्या या धोरणाचा अंदाज न आल्याने काही ठाणेदारांनी नियंत्रणात कारभार चालविला. तर काहींनी ‘जे होईल ते पाहू’ असे म्हणून ‘पूर्वी प्रमाणेच’ खुलेआम धंदे चालविले. नुकत्याच झालेल्या क्राईम मिटींगमध्येसुद्धा एसपींनी अवैध धंद्यांबाबत आक्रमक भूमिका न घेतल्याने बहुतांश ठाणेदार मंडळी सुखावली होती. मात्र त्यांचा हा आनंद औटघटकेचा ठरला. गुरुवारी एम. राज कुमार यांनी जिल्ह्यातील सर्व ठाणेदारांना आपल्या हद्दीतील तमाम अवैध धंदे तातडीने बंद करण्याचे आदेश जारी केले. अशा धंद्यांवर धाडी घालण्याचे निर्देश देण्यात आले आहे. एसपींच्या या आक्रमक भूमिकेमुळे सध्या तरी ठाणेदारांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. अवैध धंदे चालविणारेही ‘टाईट’ झाले आहेत. आता हे धंदेवाईक आणि ठाणेदारांच्या नजरा ‘हे फर्मान किती दिवस कायम राहते’ याकडे लागल्या आहे. अनेक पोलीस अधिकारी ‘काही दिवसातच पूर्वी सारखे ठिकठाक होईल’ असे दाव्याने सांगताना दिसत आहेत. काहींनी अवैध धंद्यांबाबतची साहेबांची ‘जुनी भूमिका’ तपासण्यासाठी थेट नागपूरपर्यंत लिंक लावल्याचे बोलले जाते.
यापूर्वी तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी शारदा चौकातील पोलीस चौकीच्या मागे चालणारा जुगार अड्डा स्वत: उद्ध्वस्त केला होता. तेव्हा अन्य धंद्यांबाबतही धुमधडाक्यात कारवाई होणार अशी अपेक्षा जिल्हाभरातील जनतेला होती. परंतु प्रत्यक्षात त्या धाडीनंतर सर्व काही खुलेआम चालले. एवढेच नव्हे तर धाड पडलेला तो अड्डाही पुन्हा पूर्ववत सुरू झाला. तशीच पुनरावृत्ती यावेळीसुद्धा ‘फर्मान’नंतर तर होणार नाही ना ? असा शंकेचा सूर पोलीस दलातूनच ऐकायला मिळतो आहे.
एसपींच्या आदेशानंतरही अवैध धंदे चालू राहिल्यास संबंधित ठाणेदारावर काय कारवाई होणार हे पाहणे महत्वाचे ठरते. अशा धंद्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक आपल्या देखरेखीत स्वतंत्र स्कॉड नेमतात काय याकडे नजरा लागल्या आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)

असे आहेत जिल्हाभरातील प्रमुख मटका-जुगार अड्डे

यवतमाळात सात प्रमुख मटका-जुगार अड्डे आहेत. एक क्लब तर एक क्रिकेटचा सट्टा चालतो. नेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन, आर्णी तीन, बाभूळगाव एक, कळंब दोन, राळेगाव एक, घाटंजी चार, महागाव एक, फुलसावंगी एक, उमरखेड तीन, पांढरकवडा सात, वणीमध्ये सहा, वडकी ठाण्याहद्दीत वाढोणाबाजार येथे मटका क्लब, दारव्हा ठाण्याच्या हद्दीत दोन, बोरीअरब दोन, पुसद दोन, ढाणकी एक, जोडमोहा दोन, मुकुटबन दोन, पाटण एक, पारवा तीन, शिरपूर एक, मारेगाव तीन, पुसद ग्रामीण दोन तर वडगाव जंगल पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक जुगार अड्डा चालतो. याशिवाय जिल्ह्यात सात ते आठ क्लब आणि कोंबडबाजार चालतात. क्रिकेट सट्ट्याची यवतमाळ, वणी, पांढरकवडा अशी काही खास ठिकाणे आहेत. कोंबडबाजारही विशिष्ट पोलीस ठाण्यांच्या हद्दीतच चालविला जातो.

 

Web Title: Close illegal businesses in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.