पावसाची सर्वदूर हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2017 09:10 PM2017-08-19T21:10:56+5:302017-08-19T21:11:34+5:30

पावसाळ्याचे अडीच महिने लोटले तरी जिल्ह्यात सर्वदूर पाऊस कोसळला नव्हता. शेतकरी, पिके, जनावरांसह खेडी-शहरातही पेयजलाचा प्रश्न उद्भवला होता.

Clearance of all the rain | पावसाची सर्वदूर हजेरी

पावसाची सर्वदूर हजेरी

Next
ठळक मुद्देदिवसभर रिमझिम : पिकांना जीवदान, बळीराजा सुखावला

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : पावसाळ्याचे अडीच महिने लोटले तरी जिल्ह्यात सर्वदूर पाऊस कोसळला नव्हता. शेतकरी, पिके, जनावरांसह खेडी-शहरातही पेयजलाचा प्रश्न उद्भवला होता. अखेर दीर्घकाळ चाललेला लपंडाव शुक्रवारी रात्री संपला आणि शनिवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्यात सर्वत्र अखंड पाऊस बरसला. उशिरा का होईना पण पाऊस आल्यामुळे मरणासन्न पिकांना जीवदान मिळाले आहे. तथापि जलाशयांना अद्याप जोरदार पावसाची प्रतीक्षा आहे.
जिल्ह्यावर यावर्षी वरूण राजाने अवकृपा केली. गेल्या अडीच महिन्यात जिल्ह्यात एकदाही दमदार पाऊस बरसला नाही. यात २० दिवस दीर्घ खंडाचा समावेश आहे. उर्वरित दोन महिन्यात अत्यल्प पाऊस बरसला. पावसात खंड पडताच खरिपातील पिकांनी माना टाकल्या. शेतातील उभी पिके करपू लागली. हजारो हेक्टरवरील कपाशी आणि सोयाबीनचे पीक पावसाअभावी करपले. मूग आणि उडीदाचे पिकही नष्ट झाले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले.
शुक्रवारी सायंकाळी पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला. शनिवारीही दिवसभर पाऊस बरसल्याने ऐन पोळ्यापूर्वी शेतकºयांच्या चेहºयावर थोडे हास्य उमलले. या पावसाने पिकांना संजीवनी मिळाली. मात्र अद्याप जिल्ह्यातील जलाशयांना मोठ्या प्रावसाची प्रतीक्षाच आहे. जिल्ह्यात आत्तापर्यंत वार्षिक सरासरीच्या केवळ ४० टक्के पाऊस झाला आहे. गतवर्षी यावेळेपर्यंत तब्बल ६३ टक्के पाऊस झाला होता.
गेल्या २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ८.४४ मिलीमीटर पाऊस झाला. सर्वाधिक १९ मिमी पाऊस बाभूळगाव, तर झरीमध्ये सर्वात कमी १ मिमी पावसाची नोंद झाली. शनिवारी दिवसभर पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यातील जलप्रकल्पांतील पाणीसाठा वाढण्यास मदत मिळणार आहे. तूर्तास जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये केवळ २७ टक्के जलसाठा आहे. लघु प्रकल्पांत तर केवळ २० टक्के पाणी शिल्लक आहे.
सहा प्रकल्प अद्याप कोरडेच
जिल्ह्यातील ६२ लघु प्रकल्पांत २० टक्के पाणी शिल्लक असले, तरी सहा प्रकल्प अद्याप कोरडे आहेत. यामध्ये लोहतवाडी, नेर, खरद, बोर्डा, मुडाणा, पोफाळी या प्रकल्पांचा समावेश आहे. आजमितीस जिल्ह्यातील मोठ्या पूस प्रकल्पात २०.१२ टक्के, गोकीत ११.३८, वाघाडीत १७.५१, सायखेडात ५९.९, लोअरपूसमध्ये ५३.९५, तर बोरगाव प्रकल्पात केवळ ४.०८ टक्के जलसाठा आहे. गेल्या २४ तासांत यवतमाळ १५, बाभूळगाव १९, कळंब १०, आर्णी १२, दारव्हा ७, दिग्रस ६, नेर ७, पुसद २, उमरखेड २, महागाव ८, केळापूर ९, घाटंजी ११, राळेगाव १२, वणी १२, मारेगाव २, तर झरीमध्ये १ मिमी पाऊस झाला.
निळोण्यातील जलसाठा वाढला
यवतमाळ शहराला पाणी पुरवठा करणाºया निळोणा जलाशयात सध्या २२ टक्के जलसाठा शिल्लक आहे. या साठ्यात दमदार पावसाअभावी वाड झाली नव्हती. मात्र शुक्रवारपासून यवतमाळ परिसरात पाऊस बरसत असल्याने निळोण्यातील जलसाठा २ इंचांनी वाढला आहे. यामुळे यवतमाळकरांना थोडा दिलासा मिळाला आहे.

Web Title: Clearance of all the rain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.