सफाई कंत्राटदाराकडून एसटी महामंडळाला चुना
By Admin | Updated: January 24, 2015 23:01 IST2015-01-24T23:01:56+5:302015-01-24T23:01:56+5:30
बिलामध्ये खोडतोड करून सफाई कंत्राटदाराने एसटी महामंडळाकडून एक लाख ३२ हजार रुपये एवढी रक्कम अधिक उचलली. हा प्रकार तपासणीत पुढे आला आहे. मात्र अजून तरी पोलिसात

सफाई कंत्राटदाराकडून एसटी महामंडळाला चुना
यवतमाळ : बिलामध्ये खोडतोड करून सफाई कंत्राटदाराने एसटी महामंडळाकडून एक लाख ३२ हजार रुपये एवढी रक्कम अधिक उचलली. हा प्रकार तपासणीत पुढे आला आहे. मात्र अजून तरी पोलिसात तक्रार दाखल झालेली नव्हती. वणी बसस्थानक परिसर स्वच्छतेचे काम घेतलेल्या कंत्राटदाराने हा प्रकार केला आहे.
या बसस्थानक परिसरातील स्वच्छतेचे मूल्यांकन करून आगार प्रमुखांनी कंत्राटदाराकडे देयके सोपविली. मात्र या देयकामध्ये खोडतोड करून जादा रक्कम उचल होत असल्याची बाब योग्य तपासणी न झाल्याने दडून राहिली. जवळपास वर्षभर सुरू राहिलेला हा प्रकार मागील महिन्यात उघडकीस आला. कंत्राटदाराने सादर केलेल्या देयकामध्ये बहुतांश ठिकाणी विशेषत: रकमेत खोडतोड आढळून आली. संबंधित अधिकाऱ्याने ही बाब वरिष्ठांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर चौकशी करण्यात आली.
सुरक्षा अधिकाऱ्याने केलेल्या चौकशीत या कंत्राटदाराने एक लाख ३२ हजार रुपये एवढी रक्कम अधिक उचलली असल्याचे स्पष्ट झाले. वणी आगार प्रमुखांनी मंजूर केलेले देयक आणि कंत्राटदाराने सादर केलेले देयक यात तफावत आढळून आली. दरम्यान, या कंत्राटदाराने ८० हजार रुपयांचा भरणाही महामंडळाकडे केला आहे. उर्वरित रक्कम त्याला देय असलेल्या रकमेतून कपात केली जाणार आहे. (वार्ताहर)