दोन गटांत हाणामारी
By Admin | Updated: July 1, 2017 01:08 IST2017-07-01T01:08:31+5:302017-07-01T01:08:31+5:30
अंगणात मोबाईलवर मोठ्याने का बोलतो, या क्षुल्लक कारणावरून शहरातील तेलगू वसाहत आणि नूर कॉलनीतील

दोन गटांत हाणामारी
तीन गंभीर : २३ जणांवर गुन्हा, १६ जणांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद : अंगणात मोबाईलवर मोठ्याने का बोलतो, या क्षुल्लक कारणावरून शहरातील तेलगू वसाहत आणि नूर कॉलनीतील दोन गटांत तुंबळ हाणामारी होण्याची घटना गुरुवारी रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली. धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात तीन जण गंभीर जखमी झाले. पोलिसांनी २३ जणांविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यातील १६ जणांना अटक केली. शहरात तणावपूर्व शांतता असून, पोलीस परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत.
आशीष कैलास शिंदे (२०), नरेश अल्लडवार (२२), नागनाथ परसोलू (१७) रा.तेलगू वसाहत, पुसद अशी जखमींची नावे आहे. आशीषच्या डोक्यावर धारदार शस्त्राचा वार झाल्याने त्याला नांदेड येथे हलविण्यात आले. येथील तेलगू वसाहतीमधील रहिवासी नरेश अल्लडवार, आशीष शिंदे व नागनाथ परसोलू या तिघांचा मोबाईलवर मोठ्याने का बोलता, असे म्हणत नूर कॉलनीतील काही तरुणांशी वाद झाला. त्याचे पर्यावसान हाणामारीत झाले. नूर कॉलनीतील तरुणांनी लाठीकाठी व धारदार शस्त्राने नरेश, आशीष व नागनाथवर हल्ला चढविला. त्यात हे तिघेही जखमी झाले. घटनेनंतर नूर कॉलनीतील तरुण पसार झाले. ही माहिती शहर पोलिसांना मिळताच ठाणेदार वाघू खिल्लारे ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. त्यांनी वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. जखमींना उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. आशीष शिंदेच्या तक्रारीवरून नूर कॉलनीतील तब्बल ११ जणांविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात प्राणघातक हल्ल्यासह विविध कलमांसह गुन्हे दाखल केले.
याच घटनेचे पडसाद येथील पार्वतीनगर परिसर व वसंतनगरमधील दुर्गा चौकात दिसून आले. येथे काही तरुणांनी घरावर दगडफेक केली, तर काहींनी अंगणात उभ्या असलेल्या वाहनांची तोडफोड केली. या प्रकरणात १२ जणांसह इतर ४० जणांविरुद्ध वसंतनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सात जणांना अटक करण्यात आली. त्यांच्याजवळून दोन तलवारी जप्त करण्यात पोलिसांना यश आले, तर दुर्गा चौकात नासधूस करणाऱ्यांचा शोध पोलीस घेत असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजयकुमार बन्सल यांनी सांगितले. घटनेमुळे शहरात तणावपूर्व शांतता असून, सर्व व्यवहार मात्र सुरळीत आहेत.
अफवांवर विश्वास ठेवू नका - पोलीस अधीक्षक
जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर पोलीस अधीक्षक अमरसिंह जाधव यांनी शुक्रवारी तातडीने पुसदला भेट देवून घटनास्थळाची पाहणी केली. अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. नागरिकांनी अफवा पसरवू नये तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये. कामाशिवाय कुणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांनी येथे पत्रकार परिषदेतून केले. शहरात पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून कोंम्बिंग आॅपरेशन व पेट्रोलिंग सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. उमरखेडमध्ये लवकरच उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय सुरू होत असल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, तेलगू वसाहतीतील रहिवाशांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेवून नूर कॉलनीतील तरुणांच्या त्रासाबद्दल माहिती दिली.