शहरालगतचा परिसरही तहानलेलाच
By Admin | Updated: May 17, 2014 00:30 IST2014-05-17T00:30:28+5:302014-05-17T00:30:28+5:30
शहराला लागून असलेला ग्रामीण भागातही यावर्षी तीव्र पाणीटंचाई आहे. उमरसरा, वाघापूर, लोहारा, वडगाव, भोसा, पिंपळगाव, मोहा या परिसरातील नागरिकांनासुद्धा यावर्षी पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे

शहरालगतचा परिसरही तहानलेलाच
यवतमाळ : शहराला लागून असलेला ग्रामीण भागातही यावर्षी तीव्र पाणीटंचाई आहे. उमरसरा, वाघापूर, लोहारा, वडगाव, भोसा, पिंपळगाव, मोहा या परिसरातील नागरिकांनासुद्धा यावर्षी पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. याही परिसरात मोठय़ा प्रमाणात जीवन प्राधिकरणाने नळजोडण्या दिलेल्या आहेत. परंतु आता पाणी मात्र पोहचत नाही. यवतमाळ शहराइतकीच लोकसंख्या शहराला लागून असलेल्या या ग्रामपंचायत परिसरात आहे. परंतु सध्या शहरातच मोठय़ा प्रमाणात पाणीसंकट असल्यामुळे ग्रामपंचायत परिसराकडे दुर्लक्ष होत आहे. सबंधित प्रत्येक ग्रामपंचायतचे दिवसेंदिवस वाढते क्षेत्रफळ आणि वाढती लोकसंख्या पाहता या ग्रामपंचायतीसुद्धा आपापल्या परिसराला पाणीपुरवठा करण्यात अपयशी ठरत आहे. ग्रामपंचायतींजवळ वाढत्या लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यासाठी सक्षम यंत्रणासुद्धा नसल्याचे दिसून येते. उमरसरा परिसरातील काही भागात प्राधिकरणासोबतच ग्रामपंचायतसुद्धा पाणी पुरवठा करते. परंतु इतर मोठा भाग पाण्यापासून वंचित आहे. त्यातच ग्रामपंचायतीचे पाणी हे फिल्टर केलेले नसते. त्यामुळे नागरिकांना किमान पिण्याच्या पाण्यासाठी महाराष्ट जीवन प्राधिकरणाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. प्राधिकरणाच्या नळाला या परिसरात म्हणायला एक दिवस आड पाणी येते. परंतु नळाला पाणी कधी येईल, याची काहीच खात्री राहत नाही. उमरसरा परिसर हा चढावर असल्याने या भागात पाणी पोहचायला वेळ लागतो. अनेकवेळा नळ जायच्या वेळेवर लोकांकडे पाणी पोहचते. त्यामुळे त्यांना दोन गुंडही पाणी मिळेनासे होते. हे पाणी पोहचण्याची कोणतीही वेळ नसते. कधी रात्री बारा वाजता तर कधी सकाळी पाच वाजता नळांना पाणी येते. त्यामुळे रात्र जागून काढल्याशिवाय कोणताही पर्याय नागरिकांकडे नसतो. या परिसरात काही लोकांकडे बोअरवेल असले तरी सध्या बोअरवेलला फारसे पाणी नाही. विहिरी व हातपंपसुद्धा कोरडे पडले आहे. त्यामुळे पाण्यासाठी भटकंती अटळ आहे. ज्यांच्याकडे टिल्लू मोटर आहे असे लोक पाणी ओढून घेतात. अशावेळी त्याच लाईनवरील पुढील लोकांना मात्र पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे. इतर ग्रामपंचायत परिसरांचीही हिच स्थिती आहे. पाणीटंचाईबाबत ग्रामपंचायतींकडून कोणत्याही उपाययोजना होताना दिसत नाही. अनेकांनी त्यांच्या घरगुती नळाला पाणी येत नसल्याने भटकंती केल्याशिवाय पर्याय नसल्याचे सांगितले. याबाबत वारंवार जीवन प्राधिकरणाच्या कार्यालयात जाऊन निवेदनेसुद्धा नागरिकांच्या वतीने देण्यात आले. अनेकवेळा महिलासुद्धा प्राधिकरण कार्यालयावर गेल्या. परंतु त्यांना थातूर-मातूर आश्वासन देऊन परत पाठविल्या जाते. नागरिकांनी नळाला तीन ते चार फूट खड्डे खोदले आहेत. तरीसुद्धा पाणी मिळत नाही. कधीकाळी पाणी आल्यास त्याला फोर्स राहत नाही. ग्रामपंचायतचे पदाधिकारी जनतेची विचारपूस करायलासुद्धा या काळात तयार नाही. शहरात टँकरने पाणीपुरवठा करण्यात येतो. ग्रामीण भागात तशी सोय नसल्याचे उमरसरा येथील नागरिकांनी सांगितले. (प्रतिनिधी)