माळपठारावर लिंबाच्या आकाराच्या गारा
By Admin | Updated: March 14, 2015 02:18 IST2015-03-14T02:18:47+5:302015-03-14T02:18:47+5:30
तालुक्यातील माळपठार भागाला शुक्रवारी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपिटीने अक्षरश: झोडपून काढले.

माळपठारावर लिंबाच्या आकाराच्या गारा
पुसद/बेलोरा : तालुक्यातील माळपठार भागाला शुक्रवारी सायंकाळी ६ वाजताच्या दरम्यान अवकाळी पाऊस आणि गारपिटीने अक्षरश: झोडपून काढले. लिंबाच्या आकाराच्या गारा बरसल्याने रबी पीक उद्ध्वस्त झाले. अनेक ठिकाणी वृक्ष उन्मळून पडले असून वीज पुरवठाही खंडित झाला आहे.
पुसद तालुक्यातील देवठाणा, जवळी, जवळा, खंडाळा, बेलोरा, अडगाव, हिवळणी, शेंबाळपिंपरी, फुलवाडी, फेट्रा, पिंपळगाव, नांदुरा आदी भागात सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास प्रचंड वादळासह पावसाला सुरुवात झाली. विजांच्या कडकडाटात लिंबाच्या आकाराच्या गारा बरसल्या. तब्बल अर्धा तास निसर्गाचे तांडव सुरू होते. अनेक ठिकाणी गारांचा खच साचला होता. घरांवरील टीनपत्रे उडून गेली होती. पुसद शहरातही सायंकाळच्या सुमारास वादळी पाऊस झाला. या पावसाने रबी पिकांचे मोठे नुकसान झाले असून गहू, हरभरा उद्ध्वस्त होताना शेतकऱ्यांना डोळ्याने पाहावा लागला. या वादळामुळे नेमके किती नुकसान झाले हे मात्र रात्र झाल्याने कळायला मार्ग नव्हता. परंतु मोठ्या प्रमाणात गहू, हरभरा आणि फळबागांचे नुकसान झाल्याची माहिती आहे.
महागाव तालुक्यातील गुंज परिसरालाही सायंकाळी गारांचा तडाखा बसला. या परिसरातील पिंपळगाव सूत गिरणी, कासोळा, सारकिन्ही या गावात सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास गारांचा वर्षाव झाला. यामुळे रबी पिकाला फटका बसला. (प्रतिनिधी)
खंडाळा पोलिसांची सहृदयता
माळपठार भागातील जवळी येथील एक शिक्षक दुचाकीने पुसदकडे सायंकाळी येत होता. मात्र अचानक वादळी वातावरण निर्माण झाले. लिंबाच्या आकाराच्या गारांच्या वर्षावामुळे शिक्षक दुचाकीसह खाली कोसळले. जंगलात कोणाचाही आधार नव्हता. मात्र त्याचवेळी खंडाळा ठाणेदार भगवान वडतकर या भागात गस्तीवर होते. त्यांना वादळात सापडलेले शिक्षक दिसले. तत्काळ शिक्षकाला गाडीत बसवून सुरक्षित स्थळी नेले. पोलिसांची सहृदयता एका शिक्षकाला जीवदान देणारी ठरली.