पाथ्रड गोळे येथे तहसीलदाराला घेराव
By Admin | Updated: November 22, 2014 01:55 IST2014-11-22T01:55:28+5:302014-11-22T01:55:28+5:30
जनक्षोभापुढे प्रशासनाला नमते घ्यावेच लागते. याचा प्रत्येय तालुक्यातील पाथ्रड गोळे येथे आला. रेशन आणि रॉकेलमध्ये होणारा गैरप्रकार....

पाथ्रड गोळे येथे तहसीलदाराला घेराव
नेर : जनक्षोभापुढे प्रशासनाला नमते घ्यावेच लागते. याचा प्रत्येय तालुक्यातील पाथ्रड गोळे येथे आला. रेशन आणि रॉकेलमध्ये होणारा गैरप्रकार त्वरित थांबवावा यासाठी ग्रामस्थांनी चक्क तहसीलदाराला घेराव घातला. ग्रामस्थांच्या आक्रमक पावित्र्यामुळे अखेर तहसीलदारांनी तातडीने चौकशी करण्याचे आदेश दिले.
पाथ्रड गोळे येथे स्वस्त धान्य दुकानात धान्याचा आणि रॉकेलचा मोठ्या प्रमाणात काळा बाजार होत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी केली होती. मात्र तहसीलच्या पुरवठा विभागातूनच या गैरप्रकारासाठी पाठबळ मिळत असल्याने कुठलीही कारवाई केल्या गेली नाही. यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी थेट तहसील कार्यालयावर धडक दिली. गुरूवारी दुपारी १२ वाजता तहसीलदारांच्या कक्षात ग्रामस्थांनी धरणे दिले. तातडीने चौकशी करून कारवाई केली जावी अशी मागणी लावून धरली. त्यासाठी चक्क तहसीलदारांना घेराव घातला. ग्रामस्थांच्या आक्रमक पवित्र्यामुळे तहसील परिसरात तगडा बंदोबस्त लावण्यात आला होता. त्यानंतर लगेचच नायब तहसीलदाराच्या समितीने गावात भेट देऊन चौकशी केली. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ग्रामस्थांच्या रोषामधूनच गावातील अपहाराची तीव्रता दिसून येत होती. सदर स्वस्त धान्य दुकानदार नियमाप्रमाणे धान्याचे वितरण करत नाही. आलेल्यांना कोटा संपला असे सांगून परत पाठविले जाते. विशेष म्हणजे धान्य उचलल्याची नोंद रेशन कार्डवर केली जाते. धान्याच्या दराबाबतचा कुठलाही फलक लावला जात नाही. गोरगरीब आणि महिलांशी धान्य घेण्यासाठी गेले असता असभ्य वर्तणूक केली जाते. या सर्व जाचाला त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी वाचा फोडण्यासाठी तहसीलदारांना घेराव घातला. त्यानंतरच तहसीलदारांच्या निर्देशावर नायब तहसीलदाराच्या नेतृत्वात एक पथक पाथ्रड गोळे येथे पाठविण्यात आले. त्यांनी स्वस्त धान्य दुकानादाराच्या रेकार्डची तपासणी केली. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळली. या आंदोलनात प्रीतम गावंडे, आकाश तोंडरे, रवींद्र वानखडे, जानराव पडघन, पंकज खरकाडे, कैलास पडघन, हिम्मत कणसे, खुशाल गावंडे, नरहरी नागदेवते, भास्कर ढबाले, राजेंद्र चोपडे, हरीदास पडघने, शंकर राठोड, निखिल कणसे, गजानन राठोड आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)