सिनेस्टाईल पाठलाग करून दारू पकडली
By Admin | Updated: September 3, 2015 02:10 IST2015-09-03T02:10:30+5:302015-09-03T02:10:30+5:30
अलिशान वाहनातून दारूची अवैध वाहतूक सुरू असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी यवतमाळ ते कळंब असा सिनेस्टाईल पाठलाग करून दारूसह दोन आरोपींना अटक केली.

सिनेस्टाईल पाठलाग करून दारू पकडली
कळंबमध्ये कारवाई : आलिशान वाहन ताब्यात
यवतमाळ : अलिशान वाहनातून दारूची अवैध वाहतूक सुरू असल्याच्या माहितीवरून पोलिसांनी यवतमाळ ते कळंब असा सिनेस्टाईल पाठलाग करून दारूसह दोन आरोपींना अटक केली.
रवी गोविंदा गंगावने (२७) व आशिष सुरेश मुंजेवार (२२) रा. दोघेही आठवडी बाजार वर्धा असे अटकेतील आरोपींचे नाव आहे. उपविभागीय अधिकारी पोलीस राहुल मदने यांना मिळालेल्या माहितीवरून बुधवारी दुपारी १२ वाजता ही कारवाई करण्यात आली. एम.एच.०३/सीडब्ल्यू-८०१० या आलिशान कारमध्ये देशी दारूच्या ४० पेट्या घेऊन जात होते. दरम्यान पोलीस पाठलाग करीत असल्याचे लक्षात येताच त्यांनी कार वेगाने पळविली. त्याचवेळी कळंब पोलिसांना माहिती दिली. त्यांनी नागपूर मार्गावरील पंचायत समिती कार्यालयासमोर बॅरेकेटस् लावून वाहन अडविले. पोलिसांनी दोन लाख रुपयांची दारू आणि कार जप्त केली. दारूबंदी असलेल्या वर्धा जिल्ह्यात विक्रीसाठी ही दारू जात होती, अशी माहती पोलिसांनी दिली. ही कारवाई इकबाल शेख, ऋतुराज मेडवे, संतोष मडावी आणि कळंब पोलिसांनी पार पाडली. जिल्ह्यातून दारू तस्करी होत असल्याचे यावरून पुन्हा सिद्ध झाले. (प्रतिनिधी)