भाजपा नगरसेवकाच्या घरी सिनेस्टाईल दरोडा
By Admin | Updated: June 28, 2016 02:06 IST2016-06-28T02:06:55+5:302016-06-28T02:06:55+5:30
येथील शिवाजीनगरातील पंकज नानवाणी यांच्याकडे भरदिवसा पडलेल्या दरोड्याचा शोध लागण्यापूर्वीच

भाजपा नगरसेवकाच्या घरी सिनेस्टाईल दरोडा
यवतमाळ : येथील शिवाजीनगरातील पंकज नानवाणी यांच्याकडे भरदिवसा पडलेल्या दरोड्याचा शोध लागण्यापूर्वीच गिलाणीनगरातील भाजपा नगरसेवक मोहन देशमुख यांच्या घरी सोमवारी पहाटे २.३० वाजता दरोडा पडला. सिनेस्टाईल घरात प्रवेश करून चौकीदारावर प्राणघातक हल्ला केला. दरोडेखोरांच्या हाती मात्र फारसे काही लागले नाही. लागोपाठ घडणाऱ्या घटनांनी यवतमाळ शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
भाजपाचे नगरसेवक मोहन देशमुख यांचे गिलाणीनगरात घर आहे. २२ जून रोजी ते परिवारासह परळी येथे लग्नसमारंभासाठी गेले होते. त्यांनी आपल्या घरी अनंत वऱ्हाडे (४५) रा. बाजोरियानगर या चौकीदाराला ठेवले होते. सोमवारी पहाटे दरोडेखोरांनी वॉल कम्पाऊंडवरून टेरेस गाठले. त्यानंतरही घरात प्रवेश करण्यासाठी जागाच मिळत नव्हती. स्वयंपाक खोलीच्या एग्झास्ट फॅन लावण्यासाठी केलेल्या मोठ्या छिद्रातून दरोडेखोरांनी घरात प्रवेश केला. यासाठी टेरेसच्या ग्रीलला केबल बांधून आत उडी घेतली. त्यानंतर टेरेसचे दार दार उघडले. चोरट्यांनी पहिल्या मजल्यावर असलेल्या बेडरूममध्ये प्रवेश करून कपाटाची झडती घेतली. तेथे त्यांना काहीही मिळाले नाही. नंतर मोर्चा तळमजल्यावर असलेल्या बेडरूमकडे वळविला. देव्हाऱ्यात ठेऊन असलेली काही रक्कम त्यांनी घेतली. बेडरूम उघडणार इतक्यात त्यांना हॉलमध्ये सोफ्यावर कोणीतरी झोपून असल्याचे आढळले. दरोडेखोरांनी क्षणाचाही विलंब न करता त्या व्यक्तीच्या डोक्यावर लोखंडी रॉडने प्रहार केला. ती व्यक्ती निपचित पडल्याचे लक्षात येतातच त्यांनी टेरेसवरून पळ काढला. सकाळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत गिते, संतोष केंद्रे यांनी घटनास्थळ गाठून आरोपींचा सुगावा लागतो काय, याची पाहणी केली. श्वानपथक परिसरातच घुटमळले, ठसे तज्ज्ञांनीही ठसे घेतले आहेत. शहरात घडणाऱ्या चोरी, दारोड्याच्या घटनांनी नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)
४डोक्यावर जीवघेणा प्रहार झाल्याने काही काळ बेशुद्ध असलेले चौकीदार अनंत वऱ्हाडे यांनी शुद्ध आली. त्यांनी मोहन देशमुख यांना दूरध्वनीवरून घटनेची माहिती दिली. देशमुख यांनी परिसरातील नागरिकांना फोन करून दरोडा पडल्याचे सांगितले. त्यानंतर परिसरातील नागरिक घराबाहेर आले. त्यांनी दरोड्याची माहिती वडगाव रोड पोलिसांना दिली. कॉलनीतीलच नागरिक बाहेर आल्याची खातरजमा करून चौकीदाराने घराचे दार उघडले. रक्तबंबाळ अवस्थेत चौकीदाराला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्या डोक्यावर दहा टाके पडले आहेत. दरोडेखोरांची संख्या किती होती हे समजू शकले नाही. केवळ घटनास्थळावर एका व्यक्तीची चप्पल आढळून आली.
पालकमंत्र्यांकडील दरोड्याच्या घटनेची झाली आठवण
४दरोडेखोरांच्या गुन्ह्याची पद्धत ही काही वर्षांपूर्वी विदर्भ हाऊसिंग सोसायटीत पालकमंत्री संजय राठोड यांच्या घरी पडलेल्या दरोड्याशी मिळतीजुळती आहे. येथेही बंद घरात असलेल्या चौकीदाराचा खून करण्यात आला होता. देशमुख यांच्याकडील घटनेतही चौकीदारावर जीवघेणा हल्ला झाल्याने पालकमंत्र्यांकडील घटनेची आठवण झाली.