‘सीआयडी’ची आरटीओ यंत्रणेला ‘क्लिन चिट’

By Admin | Updated: April 8, 2015 02:12 IST2015-04-08T02:12:13+5:302015-04-08T02:12:13+5:30

यवतमाळच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील बहुचर्चित ३८ ट्रकच्या बोगस पासिंग घोटाळ्यात ‘सीआयडी’ने (राज्य गुन्हे अन्वेषण विभाग) आरटीओला ‘क्लिन चिट’ देत तपास गुंडाळला आहे.

'CID chit' for RTO system | ‘सीआयडी’ची आरटीओ यंत्रणेला ‘क्लिन चिट’

‘सीआयडी’ची आरटीओ यंत्रणेला ‘क्लिन चिट’

यवतमाळ : यवतमाळच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील बहुचर्चित ३८ ट्रकच्या बोगस पासिंग घोटाळ्यात ‘सीआयडी’ने (राज्य गुन्हे अन्वेषण विभाग) आरटीओला ‘क्लिन चिट’ देत तपास गुंडाळला आहे.
सन २००६ मध्ये बोगस ट्रक पासिंग घोटाळा उघडकीस आल्यानंतर तत्कालीन डेप्युटी आरटीओंनी यवतमाळ शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यावरून फसवणुकीचा गुन्हा नोंदविला गेला. नंतर या गुन्ह्याचा तपास सीआयडीकडे सोपविण्यात आला. कित्येक वर्ष तेथे हे प्रकरण थंडबस्त्यात पडून होते. अलिकडे यवतमाळ सीआयडीचे प्रभारी पोलीस निरीक्षक एस.डी.सोळंके यांनी हा तपास पूर्ण केला. या प्रकरणात सुरुवातीला चार आरोपी अटक झाले होते. सीआयडीने आपल्या तपासात त्यात आणखी तीन आरोपींची भर घातली. हे आरोपी अंबेजोगाई, नांदेड येथील ट्रक मालक आहेत. सीआयडीने वेगवेगळ्या ठिकाणाहून ट्रकही जप्त केले. या घोटाळ्याची पाळेमुळे पुसदमध्ये एका ड्रायव्हींग स्कूलमध्ये सापडली. त्या संचालकाने बोगस रबरी शिक्के बनवून आरटीओतील यंत्रणेच्या संगनमताने तब्बल ३८ ट्रकचे बोगस पासिंग केले होते.
सीआयडीच्या तपासात आरटीओतील संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर प्रकरण शेकण्याची दाट शक्यता वर्तविली जात होती. प्रत्यक्षात मात्र सीआयडीच्या तपासाचा फुसका बार ठरला. ३८ ट्रकच्या या बोगस पासिंग घोटाळ्यात सीआयडीने आरटीओच्या तत्कालीन अधिकाऱ्यांना ‘क्लिन चिट’ दिली. वास्तविक आरटीओतील यंत्रणेच्या सहभागाशिवाय एवढा मोठा घोटाळा होणे अशक्य आहे. मात्र त्यानंतरही आरटीओतील कुणालाच आरोपी बनविले न गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. आरटीओला क्लिन चिट देण्यामागील रहस्य गुलदस्त्यात असून सीआयडीच्या कार्यप्रणालीवर संशय व्यक्त केला जात आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: 'CID chit' for RTO system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.