वाटमारी करणाऱ्या तिघांना दिला चोप
By Admin | Updated: March 16, 2015 01:50 IST2015-03-16T01:50:18+5:302015-03-16T01:50:18+5:30
यवतमाळ मार्गावरील इचोरी फाट्यावर रविवारी सायंकाळी ५.३० वाजता एका दुचाकीस्वाराला तिघांनी अडवून बेदम मारहाण करत रक्कम हिसकावली.

वाटमारी करणाऱ्या तिघांना दिला चोप
बोरीअरब: यवतमाळ मार्गावरील इचोरी फाट्यावर रविवारी सायंकाळी ५.३० वाजता एका दुचाकीस्वाराला तिघांनी अडवून बेदम मारहाण करत रक्कम हिसकावली. या घटनेची माहिती दुचाकीस्वारने आपल्या मित्रांना दिली. त्यावरून मित्रांनी शोध घेतला असता जामवाडी धाब्यावर मद्य प्राशन करताना आरोपी आढळले. त्या तिघांना चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले.
आरोपी नरेंद्र बाळकृष्ण सुखदेवे (३५), नरेंद्र वसंतराव रंगारी (२८) दोघेही रा. इचोरी, सैय्यद अजमल अमन (३३) रा. यवतमाळ अशी वाटमारी करणाऱ्यांची नावे आहे. आर्णी तालुक्यातील लोणबेहळ येथील आशीष नागेलवार दुचाकीने दारव्हा येथे जात होता. त्याला इचोरी फाट्याजवळ पल्सरवर आलेल्या तिघांनी अडविले. बेदम मारहाण करून त्याच्याकडील रोख दीड हजार आणि मोबाईल हिसकावून घेतला. या घटनेने भयभीत झालेला आशीष परत भोयरजवळच्या पेट्रोलपंपावर आला. त्याने घटनेची माहिती राष्ट्रवादी युवकचे प्रदेश सरचिटणीस विवेक गावंडे याला दिली. त्यानंतर मित्रांसह आशीष याने घटनास्थळ गाठून आरोपींचा शोध घेणे सुरू केले. जामवाडी धाब्यावर तीनही आरोपी मद्यधुंद अवस्थेत आढळून आले. या तिघांना तिथेच चांगला चोप दिला. दुचाकीसह लाडखेड पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यांच्यावर वाटमारीचा गुन्हा नोंदविला.(वार्ताहर)