कारच्या धडकेत दुचाकीस्वार वडिलांसह चिमुकली ठार

By Admin | Updated: November 2, 2016 00:49 IST2016-11-02T00:49:00+5:302016-11-02T00:49:00+5:30

गोदनी येथील वाघामायच्या दर्शनासाठी जात असताना शिंगारे कुटुंबीयांवर काळाने झडप घातली.

Chimukali killed along with two-wheelers in the car | कारच्या धडकेत दुचाकीस्वार वडिलांसह चिमुकली ठार

कारच्या धडकेत दुचाकीस्वार वडिलांसह चिमुकली ठार

आई व मुलगी गंभीर : गोधनी बायपासवरील हृदयद्रावक घटना
यवतमाळ : गोदनी येथील वाघामायच्या दर्शनासाठी जात असताना शिंगारे कुटुंबीयांवर काळाने झडप घातली. गोदनी बायपास चौफुलीवर त्यांच्या दुचाकीला घाटंजी रोडकडून येत असलेल्या कारने जोरदार धडक दिली. यात चिमुकलीसह वडीलाचा जागीच मृत्यू झाला. तर मायलेकी गंभीर जखमी झाल्या. ही घटना मंगळवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास घडली.
अरविंद मनोज शिंगारे (३६) रा. संभाजीनगर, कोमल अरविंद शिंगारे (५) अशी मृतांची नावे आहेत. अपघातात शिल्पा अरविंद शिंगारे (२८) आणि मुलगी रोहिणी अरविंद शिंगारे (३) या दोघी गंभीर जखमी आहेत. त्यांना उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले आहे. अरविंद हा आपल्या दोन मुली आणि पत्नीसह दुचाकीने (एमएच २९ एक्स १०१७) संभाजीनगर, जयविजय चौक येथून आराध्य दैवत असलेल्या वाघामायच्या दर्शनासाठी जात होते. दुपारी दोन वाजताच्या सुमारास गोदनीकडे जाताना बायपासवरच्या चौफुलीवर घाटंजी रोडकडून आर्णी मार्गाकडे जाणाऱ्या फियाट कारने (क्रं. एमपी ०४ सीएच ३७०४) जोरदार धडक दिली. चौफुलीच्या मधोमधच कार दुचाकीवर धडकली. या अपघातात अरविंद आणि कोमलचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. तर पत्नी शिल्पा व रोहिणी या दोघी गंभीर जखमी आहेत. शिवाय कारचा चालकही जखमी आहे. त्यांना उपचारार्थ शासकीय रुग्णालयात दाखल केले. शिल्पा व रोहिणीची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना नागपूर येथे हलविण्यात आले. अरविंद हा चंद्रपूर येथील खासगी एक्स-रे क्लिनिकमध्ये तंत्रज्ञ म्हणून काम करत असल्याचे सांगण्यात आले. दिवाळीनिमित्त तो घरी आला होता.
या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक अलका गायकवाड करत आहे. त्यांनी घटनास्थळावर धाव घेऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले. वृत्त लिहेपर्यंत कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Chimukali killed along with two-wheelers in the car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.