मुलांना जनावरासारखा हाकलत घेऊन गेला...

By Admin | Updated: September 8, 2016 01:06 IST2016-09-08T01:06:30+5:302016-09-08T01:06:30+5:30

बुधवारची सकाळ फाळेगावात चार जिवांचा आकांत घेऊनच उगवली. धडधाकट बाप आपल्या तीन चिल्यापिल्यांना अक्षरश: मारत शेताकडे घेऊन निघाला होता.

The children took the animals like a leper ... | मुलांना जनावरासारखा हाकलत घेऊन गेला...

मुलांना जनावरासारखा हाकलत घेऊन गेला...

फाळेगावची थरारक घटना : तीन अपत्यांना विहिरीत लोटून रागावलेल्या बाबाचीही आत्महत्या
अविनाश साबापुरे फाळेगाव (बाभूळगाव)
बुधवारची सकाळ फाळेगावात चार जिवांचा आकांत घेऊनच उगवली. धडधाकट बाप आपल्या तीन चिल्यापिल्यांना अक्षरश: मारत शेताकडे घेऊन निघाला होता. कामाला नव्हे, मारायला! बाबाचा आवेश पाहून मुलांना मृत्यू नजरेपुढे दिसत होता. चिमुकले जीव वाचविण्यासाठी पळण्याचा प्रयत्न करीत होते अन् बाप जनावरांचा कळप हाकावा, तसा मुलांना एकत्र करून विहिरीकडे हाकलत होता. दीड किलोमीटरच्या या बाप-लेकांच्या ‘अंतिम’यात्रेत अनेक गावकऱ्यांनी मध्यस्थी करून पाहिली. पण बाप ऐकण्याच्या स्थितीत नव्हता. शिवारात पोहोचला. खोल विहिरीत आधी मुलांना लोटले. मग स्वत:ही विसर्जित झाला... त्याच्या मनातला राग बुडून गडप झाला. मुलांच्या किंकाळ्या संपल्या. विहीर शांत झाली. पण समाजमन गलबलून गेले. अशा मरणाचे कारण काय? एकच प्रश्न अन् असंख्य शंका मागे उरल्या...
एका जन्मदात्याने आपल्या तीन अपत्यांसह आत्महत्या केल्याने बाभूळगाव तालुक्यातील फाळेगाव हादरले. मोठ्यांच्या विवंचना तीन लहानग्यांचाही बळी घेऊन गेल्याने पाच हजार लोकसंख्येच्या फाळेगावात बुधवारी चुलीच पेटल्या नाही. फाळेगावच्या मुख्य वस्तीपासून किंचित बाजूला असलेल्या इंदिरा आवास वस्तीत पांडुरंग कोडापे यांचे कुटुंब राहते. ३५ वर्षांचा हा तरुण मोलमजुरी करून उदरनिर्वाह करायचा. पण दुर्दैव त्याच्या मागावरच होते. पहिल्या पत्नीसोबत पटले नाही म्हणून सोडचिठ्ठी झाली. तिच्यापासून झालेल्या गायत्रीचा सांभाळ पांडुरंगच करायचा. वंदनाशी त्याने दुसऱ्यांदा संसाराचा डाव मांडला. तोही फसला. वारंवार खटके उडू लागले. दुसऱ्या पत्नीपासून त्याला जय आणि कोमल ही दोन अपत्ये झाली. पांडुरंगचे वृद्ध आईवडील शांताबाई आणि श्रीराम मुलाचा भार कमी करण्यासाठी लासिना गावात राहायला गेले.
दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असली तरी कुडाच्या घरात नेटका संसार करण्यासाठी पांडुरंग कसोशीने धडपडत होता. यंदा त्याने तीन एकर कोरडवाहू शेत बटईने करून उत्पन्न वाढविण्याचा प्रयत्न केला. शेतीसाठी म्हणून त्याने ‘बेसिक’चे कर्ज घेतले. बेसिकचे कर्ज म्हणजे, प्रायव्हेट फायनान्स कंपनीचे कर्ज. गावातील इतर शेतकऱ्यांप्रमाणेच पांडुरंगनेही उत्कर्ष फायनान्स कंपनीचे ३५ हजारांचे कर्ज घेतले. शेतातले सोयाबीन भरात आले. अशातच पांडुरंग आणि त्याची पत्नी वंदना गावातीलच स्वप्नील बानूबाकोडे यांच्या शेतात मजुरीलाही जाऊ लागले. पण गरिबीशी लढता लढता संसारात शाब्दिक वाद वाढू लागले.
बुधवारी सकाळी असेच काहीतरी बिनसले. पांडुरंगने डोक्यात राग घालून घेतला. आता जगण्यात अर्थ नाही, या विचारापर्यंत तो पोहोचला. पण त्याच्या डोक्यातल्या रागाने निरागस मुलांनाही कवटाळण्याचे ठरविले होते. अंगणात सडा टाकणाऱ्या गायत्रीला (१४) त्याने पकडले. दुकानातून ब्रेड घेऊन आलेल्या जयलाही (१०) ताब्यात घेतले. लहानगी कोमल घरातच खेळत होती. तिलाही उचलून घेतले अन् तरातरा निघाला शिवाराकडे. वाटेत मुलं निसटण्याचा प्रयत्न करीत होते. पांडुरंग त्यांना शिव्या हासडून शिवाराकडे लोटत होता. गावकरी हा तमाशा पाहात होते. काहींनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. पण ‘आता कोणी मंदात याचं नाई’ म्हणून त्याने सर्वांना पिटाळून लावले. बानू बाकोडे यांच्या शेतात हे बापलेक पोहोचले. तेव्हा पळून जाऊ पाहणाऱ्या इवल्या इवल्या जिवांना आधी विहिरीच्या हवाली केले आणि स्वत: पांडुरंगही ३५ फूट खोल विहिरीत धडाम अंतर्धान पावला. अख्खे कुटुंब खलास झाले. उरली केवळ अभाग्याची पत्नी आणि देवाघरी गेलेल्या तीन चिमुकल्यांची आई वंदना. तिलाही पोलिसांनी गावात पोहोचताच चौकशीसाठी ताब्यात घेतले. गावातले सर्व पुरुष विहिरीभोवती गोळा झाले अन् सर्व महिला घराबाहेर येऊन डोळ्याला पदर लावत मूक नजरेने स्वप्नील बानूबाकोडे यांच्या शेताच्या दिशेने बघत बसल्या...

मुलं चुणचुणीत होती
पांडुरंग कोडापे हा तरुण चारचौघात मिसळून राहणारा होता. कधी-कधी दारु पित असला तरी वाह्यातपणा कधीच करायचा नाही, असे गावकऱ्यांनी सांगितले. पांडुरंगची मुलं गरिबीतच जगत होती. पण चुणचुणीत होती, असे सरपंच प्रतिभा पारधी यांनी सांगितले. फाळेगावातल्याच जिल्हा परिषद डिजिटल स्कूलमध्ये गायत्री सातव्या वर्गात शिकत होती. तर जय चौथ्या वर्गात होता. लहानगी कोमल यंदा अंगणवाडीत जाऊ लागली होती. गायत्री खूप हुशार नसली तरी अभ्यास तिला आवडायचा. खेळण्यात तिला उत्साह होता, असे तिच्या शिक्षकांनी सांगितले. आज ही तिन्ही मुलं शाळेत का आली नाही, याचा विचार करीत असतानाच शाळेत त्यांच्या थरारक मृत्यूची वार्ता पोहोचली.

गावकरी चुकचुकले...अडविले असते तर !
पांडुरंग कोडापे सकाळीच मुलांना मारत शिवाराकडे घेऊन निघाला. वाटेत आलेल्या प्रत्येक गावकऱ्याला अचंबा वाटला. प्रत्येकाने त्याला हटकले. पण इरेला पेटलेल्या पांडुरंगने प्रत्येकाला खडसावून बाजूला सारले. निरागस गायत्री, जय आणि कोमल गावकऱ्यांना हात पुढे करून वाचविण्याची विनवणी करीत होते. पण पांडुरंगच्या रूद्रावतारापुढे कुणाचे काही चालले नाही. नंतर चार जणांच्या मृत्यूची वार्ता कळताच विहिरीभोवती अख्खा गाव गोळा झाला. अरेरे.. आपण काही तरी करून पांडुरंगला अडवायला हवे होते. त्याने दोन थापडा मारल्या असत्या तरी चालले असते. पण निदान पोरांचा जीव तरी वाचला असता.. अशी अपराधीपणाची भावना प्रत्येक गावकऱ्याच्या तोंडून व्यक्त होत होती.

खासगी फायनान्सचा विळखा
फाळेगावात अनेक अल्पभूधारक शेतकरी आहे. अनेकांनी मक्त्या-बटईने शेती केली आहे. असे शेतकरी खासगी फायनान्स कंपन्यांच्या गळाला लागले आहेत. विहिरीत उडी घेऊन मुलांसह जीवन संपवणारा पांडुरंग कोडापेही त्यातलाच एक होता. त्यानेही उत्कर्ष फायनान्स कंपनीच्या धामणगाव शाखेचे ३५ हजारांचे कर्ज घेतले होते. गावातले शेतकरी या कर्जाला ‘बेसिक’ कर्ज म्हणून संबोधतात. अन् ते सहज मिळते म्हणून आनंदाने सांगतात.

Web Title: The children took the animals like a leper ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.