दोन वेळच्या भाजी भाकरीत बाळंतपण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 00:50 IST2017-08-15T00:50:03+5:302017-08-15T00:50:38+5:30
कधी काळी ग्रामीण भागातील चालतं बोलतं प्रसूतीगृह म्हणजे गावातील दाई. अशीच एक सर्वगुणसंपन्न दाई हिवरीत आहे.

दोन वेळच्या भाजी भाकरीत बाळंतपण
शिवानंद लोहिया ।
लोकमत न्यूज नेटवर्क
हिवरी : कधी काळी ग्रामीण भागातील चालतं बोलतं प्रसूतीगृह म्हणजे गावातील दाई. अशीच एक सर्वगुणसंपन्न दाई हिवरीत आहे. सुभाबाई टिकनोर. अक्षरांची कधीही ओळख झाली नाही, पण सुखरूप बाळंतपण कसं करावं यात तिचे हात निष्णात.
घरात अठराविश्व दारिद्र्य. १९७२ च्या दुष्काळात अंबाडीच्या भाकरी खावून जिवंत राहण्याची तिने धडपड केली. आता ती वृद्ध झाली. तिच्या हातून बाळंतपण झालेली अनेक लेकरेही आज तरणीताठी झालीत. कुणी सरकारी नोकरीत गेले, कुणी मोठ्या हुद्द्यावर आहेत. पण सुभाबाईच्या हालअपेष्टांची कुणीच विचारपूस करीत नाही. याचं तिलाही दु:ख वाटतं. आयुष्यभर केलेल्या सेवेबाबत बोलतं केलं, तर सुभाबाई म्हणाली...‘साल आठवत नाय. पण बाबू इंदिरा गांधीचा बंदुकीच्या गोया घालून खून केला व्हता, त्या वर्षापासून मी गावातील गरोदरी लेकीबाळीचं बाळंतपण करते. तवा अन्न धान्याची वानवा व्हती. मंग दोन टायमाच्या भाजी भाकरीची मजुरी म्हणूनही मी बाळंतपण केलं. माह्या हातून बाळंत झालेली काही पोरं आता आजी आजोबा झाले.’ एवढा दीर्घ अनुभव सांगतानाही सुभाबाईच्या बोलण्यात उपकाराची भाषा येत नाही.
‘तवा येसट्या व्हत्या, पण रस्ते खड्ड्यात व्हते. म्हणून बाळंतपणं गावातच व्हायचं. आईच्या दुधासारखं टॉनिक नाही, हे माह्या मायनं सांगतलेला मंत्र मी गावागावात पोहोचवला. मायच्या पोटातून जन्म होताच तान्हुल्याले थंड्या पाण्याने अंघोळ घालताच त्याच्या रडण्याने बाळंतीणीच्या वेदना पळून जायच्या. गरिबीतल्या लेकीले गव्हाच्याजाडसर दळलेल्या रव्यात गुळाचेपाणी टाकून केलेला शिरा खावू घालायची. तर खात्या पित्या घरच्या बाळंतीणीला खारिक, खोबरं, काजू, मणुका खाण्यास सांगायची. पण बाबू आता जमाना बदलला हाय. तुरीच्या झाडाले बरबटीच्या शेंगा लागायची वेळ आली...’
जुन्या काळाचा पट उभा करताना सुभाबाई बदलत्या काळाची मनाला टोचणारी सलही व्यक्त करते. सिनेमात नाचणाºया अन् शिवारात कापूस वेचणाºया बाया सारख्याच हाडा मासाच्या. पण आज कालच्या लेकी थर्माकोलसारख्या नाजूक झाल्या. मी सहा लेकराची माय. बाळंतपणाच्या दिवसापर्यंत धुणी भांडी केली. विहिरीवरून पाणी काढून आणायची. तरी ठणठणीत राहायची. आताच्या लेकी लई नाजूक झाल्या.... सुभाबाईसारख्या दाईन गावागावात होत्या. कपभर काळ्या चहात चार सहा महिने बाळाची मालीश करून देणारी ही दाई आज वृद्धापकाळात भाकरीसाठी भटकत आहेत.
गावात कुणाच्या पोटी मुलगा झाला तर मला चार पायल्या ज्वारी अन् लुगडं भेटायचं. मुलगी झाली तर दोन पायल्या ज्वारी अन् चोळीचा खण मिळायचा. मुला-मुलीतला हा भेदभाव आजही संपला नाही, याचा खेद वाटते.
- सुभाबाई टिकनोर,
दाईन, हिवरी.