बालकांच्या मदतीसाठी चाईल्ड लाईन
By Admin | Updated: October 21, 2016 02:19 IST2016-10-21T02:19:48+5:302016-10-21T02:19:48+5:30
काळजी व संरक्षणाची गरज असणाऱ्या बालकांच्या मदतीकरिता चाईल्ड लाईन-१0९८ ही संस्था कार्यरत आहे.

बालकांच्या मदतीसाठी चाईल्ड लाईन
सल्लागार मंडळाची बैठक : बालकांची काळजी व संरक्षण
यवतमाळ : काळजी व संरक्षणाची गरज असणाऱ्या बालकांच्या मदतीकरिता चाईल्ड लाईन-१0९८ ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेच्या सल्लागार मंडळाची बैठक महसूल भवनात पार पडली.
चाईल्ड लाईन संस्था काळजी व संरक्षणाची गरज असणाऱ्या जिल्ह्यातील बालकांच्या मदतीला धावून जाते. ग्रामीण समस्या मुक्ती ट्रस्टतर्फे ही संस्था चालविली जाते. संस्थेच्या सल्लागार मंडळाची बैठक अतिरिक्त जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी उपविभागीय अधिकारी राजेंद्र देशमुख, प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता पाटेकर, महिला व बालकल्याण अधिकारी अर्चना इंगोले, समाजकल्याण अधिकारी चव्हाण, शासकीय बालगृहाचे पाटील, बीएसएनएलचे प्रबंधक, माहिती कार्यालयाचे गजानन कोटुरवार उपस्थित होते.
अतिरिक्त जिल्हाधिकारी राऊत यांनी बैठकीत जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये चाईल्ड लाईनची माहिती दर्शनी भागात लावण्याचे निर्देश शिक्षण विभागाला दिले. बीएसएनएलच्या देयकावर संस्थेचा लोगो छापावा, खासगी शाळांमध्ये कार्यक्रम घेण्यासाठी पत्र द्यावे, असे सूचित करण्यात आले. तसेच आरोग्य विभाग व शासकीय महाविद्यालयांना विशेष सूचना देण्यात येणार आहे. मुलांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटना लक्षात घेऊन शहरी भागात पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती करण्याचा निर्णय घेण्यात आला. शिशूच्या काळजीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला विशेष सूचना देण्यात आल्या.
सल्लागार मंडळाच्या बैठकीला आरोग्य, शिक्षण विभागासह सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सपना लोडम यांनी संस्थेबाबत माहिती सादर केली.
(शहर प्रतिनिधी)