जिल्ह्यात धोकादायक कामांवर राबताहेत बालमजूर

By Admin | Updated: April 29, 2015 02:23 IST2015-04-29T02:23:49+5:302015-04-29T02:23:49+5:30

शिक्षण हक्क कायद्यानुसार मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण दिले जात असले तरी जिल्ह्यातील अनेक चिमुकले हात विविध ठिकाणी राबताना दिसतात.

Child labor in dangerous activities in the district | जिल्ह्यात धोकादायक कामांवर राबताहेत बालमजूर

जिल्ह्यात धोकादायक कामांवर राबताहेत बालमजूर

यवतमाळ : शिक्षण हक्क कायद्यानुसार मुलांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण दिले जात असले तरी जिल्ह्यातील अनेक चिमुकले हात विविध ठिकाणी राबताना दिसतात. अनेक मुले तर धोकादायक कामांवर आई-वडिलांसोबत काम करताना दिसतात. गुमास्ता नियमांचे उल्लंघन होत असून संबंधित विभागही त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.
१४ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना दुकानात कामाला ठेवणे, त्यांच्याकडून काम करून घेणे हे कायद्यान्वये गुन्हा आहे. मात्र दिग्रस शहरात सर्रास बाल कामगारांकडून लहानमोठी कामे करवून घेतली जात आहे. प्रशासनासमोर लहान मुले काम करताना दिसत असताना कोणतीही कारवाई मात्र केली जात नाही. शहरातील हॉटेल, चहा टपऱ्या, कापड दुकान, किराणा दुकान, पाणीपुरी स्टॉल, थंड पेयाची दुकाने यासह अनेक ठिकाणी बालमजूर राबत आहे. एवढेच नव्हे तर वीटभट्ट्यांवरही बालमजूर आई-वडिलांसोबत राबताना दिसत आहे. गारा तुडविणे यासह ओल्या विटा वाहून नेणे आदी कामे ही मुले करताना दिसून येतात.
अनेक दुकानात येथे बालकामगार राबत नाही, असे फलक लावलेले असतात. मात्र त्याच दुकानात लहान मुले काम करताना दिसून येतात. बालवयात त्यांच्यावर विपरित परिणाम होण्याची शक्यता असते.
हॉटेल, बारमध्ये ग्राहकांकडून अपशब्द त्यांना ऐकावे लागतात. यातून त्यांची मानसिकता खच्चीकरण होण्याची शक्यता असते. अनेकदा या मुलांना पेलवणार नाही, अशी कामे सक्तीने करवून घेतली जातात. मुलांना कामावर राबविणे गुन्हा असले तरी व्यापारी पैसे वाचविण्याच्या नादात लहान मुलांना कामावर ठेवतात. मोठ्या व्यक्तीला अधिक पैसे द्यावे लागते. तो मन लावून काम करेल याची कोणतीही खात्री नसते त्यामुळे दुकानांमध्ये लहान मुलांनाच पसंती दिली जाते. चहाच्या दुकानात तर हमखास बालकामगार राबताना दिसून येतात.
याप्रमाणेच बालकांना गॅरेजवरही हेल्पर म्हणून राबविले जाते. त्याच्या भवितव्याची वाढ येथेच खुंटविण्यात येते. मटका अड्डे, जुगार अड्ड्यांवरही अल्पवयीन मुलांचा वावर असतो. अशा धोकादायक व बालमनावर दुरोगामी परिणाम करणाऱ्या व्यवसायांमध्ये ही मुले हकनाक लोटली जात आहे. बालमजूरी थांबविण्यासाठी शासन विविध स्तरावर प्रयत्न करीत असले तरी यश मात्र येत नाही. अनेक ठिकाणी यंत्रणेतील उदासिन अधिकारी, कर्मचाऱ्यांमुळे शेकडो चिमुकले धोकादायक व्यवसायात
राबताना दिसत आहे.
(कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Child labor in dangerous activities in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.