बांधकाम समितीच्या बैठकीला प्रमुखांची दांडी
By Admin | Updated: October 10, 2015 02:01 IST2015-10-10T02:01:05+5:302015-10-10T02:01:05+5:30
जिल्हा परिषदेतील बांधकाम समितीच्या बैठकीला आरोग्य आणि पशुसंवर्धन विभागाच्या प्रमुखांनी दांडी मारली.

बांधकाम समितीच्या बैठकीला प्रमुखांची दांडी
सदस्य संतप्त : इमारतींचे बांधकाम गाजले
यवतमाळ : जिल्हा परिषदेतील बांधकाम समितीच्या बैठकीला आरोग्य आणि पशुसंवर्धन विभागाच्या प्रमुखांनी दांडी मारली. शुक्रवारी आयोजित या बैठकीत काही उपविभागीय अभियंत्यांनी अक्षरश: चुकीची माहिती दिल्याने सदस्यांनी रोष व्यक्त केला. आरोग्य व पशुसंवर्धन विभागाच्या इमारत बांधकाम आढाव्यावरून ही बैठक गाजली.
बांधकाम सभापती सुभाष ठोकळ यांच्या अध्यक्षतेत समितीची बैठक झाली. बैठकीत दारव्हा येथील सदस्य अमोल राठोड यांनी उपकेंद्र इमारतीच्या बांधकामाचा मुद्दा उपस्थित केला. भांडेगाव येथील इमारत बांधकाम कोणत्या स्तरावर आहे, याची माहिती बैठकीत मिळाली नाही. दारव्हा येथे समाधान शिबिर असल्याने तेथील उपविभागीय अभियंता बैठकीला गैरहजर होते. यावरून त्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. आरोग्य आणि पशुसंवर्धन विभागाच्या प्रमुखांनीसुद्धा या बैठकीला त्यांचे प्रतिनिधीच पाठविले होते. त्यामुळे इमारत बांधकामाची खरी स्थिती काय आहे, त्यात कोणत्या अडचणी येतात, जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून काही असहकार्य होते का, याची खातरजमा अनेक सदस्यांना करता आली नाही. योगेश पारवेकर यांनीसुद्धा घाटंजी तालुक्यातील आरोग्य उपकेंद्र इमारतीच्या उद्घाटनाचा मुद्दा बैठकीत लावून धरला. उमरखेडमध्ये मुळावा येथे बांधकाम विभागाने बांधलेल्या इमारतीवरच जिल्हा परिषद बांधकाम विभागाने दुसरा मजला उभारावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे. प्रत्यक्षात मात्र हे शक्य नसल्याने असे करता येत नाही, अशी माहिती देण्यात आली.
जिल्हा नियोजन समितीकडून ५०-५४ आणि ३०-३४ या शिर्षकाखाली मिळणाऱ्या निधीतून जिल्हा परिषदेच्या अधिपत्याखाली येत असलेल्या रस्त्यांवर काम करण्यासाठी नाहरकत द्यावी, यावर बैठकीत चर्चा झाली. मात्र जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जिल्हा परिषदेच्या रस्त्यांवर दुसऱ्या कुणीही काम करू नये, असाच ठराव घेण्यात आला. त्यामुळे या मुद्यावरही बैठकीत फार चर्चा झाली नाही. यापूर्वी जिल्हा परिषद सदस्यांनी शासनाच्या दरकराराची प्रत ही मराठीतून देण्यात यावी, अशा मागणीचा ठराव घेतला होता. मात्र या ठरावाला अधीक्षक अभियंता अमरावती यांनी स्पष्ट नकार दिला आहे. या बाबत पुन्हा पत्र पाठविण्याचे निर्देश सभापती सुभाष ठोकळ यांनी दिले.
बैठकीला दोन्ही बांधकाम विभागातील १० उपअभियंत्यापैकी कळंब व दारव्हा येथील उपअभियंते उपस्थित नव्हते. मागील इतिवृत्ताचे वाचन करून इमारत बांधकामाच्या मुद्यावरूनच बैठकीत सदस्यांनी संताप व्यक्त केला. (कार्यालय प्रतिनिधी)