शिक्षकांच्या फेरबदलीने सीईओ पेचात

By Admin | Updated: June 25, 2016 02:24 IST2016-06-25T02:24:46+5:302016-06-25T02:24:46+5:30

जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या रद्द केल्यानंतर नव्याने बदली प्रक्रिया राबविण्याचा आदेश गुरुवारी रात्री ई-मेलवर पोहोचला.

The Chief Executive Officer | शिक्षकांच्या फेरबदलीने सीईओ पेचात

शिक्षकांच्या फेरबदलीने सीईओ पेचात

बदल्यांचे कवित्व : एका दिवसात कशा करायच्या बदल्या?
यवतमाळ : जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या रद्द केल्यानंतर नव्याने बदली प्रक्रिया राबविण्याचा आदेश गुरुवारी रात्री ई-मेलवर पोहोचला. ग्रामविकास विभागाच्या सचिवांचे पत्र प्राप्त झाल्याचे कळताच शिक्षकांनी जिल्हा परिषदेत धाव घेतली. तर केवळ एका दिवसात बदली प्रक्रिया कशी राबवावी, हा प्रश्न सीईओंसाठी डोकेदुखी बनला.
मे महिन्यात शिक्षकांच्या बदल्या केल्या. त्यावर आक्षेप घेत काही शिक्षक नेत्यांनी ग्रामविकास मंत्रालयातून बदली प्रक्रियेवर स्टे मिळविला. विभागीय आयुक्तांच्या चमूने जिल्हा परिषद गाठून दोन दिवस चौकशी केली. हा चौकशी अहवाल ७ जून रोजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यापर्यंत पोहोचला. ग्रामविकास मंत्र्यांनी २३ जून रोजी विभागीय आयुक्तांचा अहवाल ग्राह्य धरून नव्याने बदली प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले. ग्रामविकास विभागाचे सचिव संजय कुडवे यांनी गुरुवारी रात्रीच ९ वाजताच्या सुमारास सीईओंच्या ई-मेलवर फेरबदली करण्याचे पत्र पाठविले.
बदलीची पुनर्प्रक्रिया राबविली जाणार हे काहीसे अपेक्षितच होते. परंतु केवळ एका दिवसात म्हणजे २५ जूनपर्यंत शिक्षकांच्या बदल्या करण्याचे या पत्रात म्हटले आहे. संपूर्ण प्रक्रिया एका दिवसात कशी पूर्ण होणार, असा पेच सीईओंपुढे निर्माण झाला आहे. सुमारे २०० शिक्षकांनी जिल्हा परिषदेत धाव घेऊन बदली प्रक्रिया खरोखरच पुन्हा होणार आहे का? याची खातरजमा करून घेतली. मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला, जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ.आरती फुपाटे यांची भेट घेण्यात आली. एका दिवसात प्रक्रिया पूर्ण होणे अशक्य असल्याचे सीईओंनी स्पष्ट केले. त्यावेळी बदल्यांसाठी मुदतवाढीची मागणी ग्रामविकास मंत्रालयाकडे करावी, त्याबाबत शासनाकडून मार्गदर्शन मागवावे, अशी अपेक्षा बदली समर्थक शिक्षकांनी व्यक्त केली. आमदार मनोहरराव नाईक यांचीही भेट घेतली. मुदतवाढीला त्यांनीही समर्थन दर्शविले. जिल्हा परिषद अध्यक्ष फुपाटे यांनी ३१ जुलैपर्यंत बदल्यांसाठी मुदतवाढ मागणी पत्र ग्रामविकास विभागाला पाठविले आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: The Chief Executive Officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.