मुख्य अभियंता मंडपे रस्त्यांच्या भेटीला
By Admin | Updated: November 12, 2014 22:51 IST2014-11-12T22:51:00+5:302014-11-12T22:51:00+5:30
सार्वजनिक बांधकाम खात्याचे अमरावती येथील मुख्य अभियंता पी.एस. मंडपे यवतमाळ जिल्ह्यातील उखडलेल्या रस्त्यांच्या भेटीला येत आहेत. गुरुवारपासून तीन दिवस ते जिल्ह्यात मुक्कामी आहेत.

मुख्य अभियंता मंडपे रस्त्यांच्या भेटीला
यवतमाळ : सार्वजनिक बांधकाम खात्याचे अमरावती येथील मुख्य अभियंता पी.एस. मंडपे यवतमाळ जिल्ह्यातील उखडलेल्या रस्त्यांच्या भेटीला येत आहेत. गुरुवारपासून तीन दिवस ते जिल्ह्यात मुक्कामी आहेत. या काळात ते यवतमाळ, पुसद, पांढरकवडा या तीनही विभागांचा आढावा घेणार आहेत.
पी.एस. मंडपे गुरुवारी पांढरकवड्यात, शुक्रवारी यवतमाळात आणि शनिवारी पुसदमध्ये कामांना प्रत्यक्ष भेटी देऊन बांधकाम अभियंत्यांकडून आढावा घेणार आहेत. मंडपे अमरावतीत रुजू झाल्यानंतर पहिल्यांदाच एवढ्या दीर्घ दौऱ्यावर येत असल्याने बांधकाम खात्याची तीनही विभागातील यंत्रणा कामी लागली आहेत.
अतिवृष्टीमुळे यवतमाळ जिल्ह्यातील रस्ते मोठ्या प्रमाणात उखडले आहेत. या रस्त्यांच्या कायम व तात्पुरत्या दुरुस्तीचे बजेट शासनाला बांधकाम खात्याने पाठविले आहे. मात्र यावर्षीच्या डागडुजीसाठी पाहिजे तेवढा पैसा उपलब्ध झाला नाही. दोन वर्षापूर्वीच्या कामाची थकीत देयके अलिकडेच मिळाली आहे. जिल्ह्यातील राज्य मार्ग, जिल्हा मार्ग व अंतर्गत रस्त्यांची नेमकी अवस्था काय, नव्याने बांधण्यात आलेल्या रस्त्यांची कामे खरोखरच गुणवत्तेनुसार झालेली आहेत काय, याची तपासणी मंडपे यांच्या दौऱ्यात होणार आहे. याशिवाय पुलांचीही तपासणी होणार आहे. कारण रेती माफियांमुळे जिल्ह्यातील अनेक मोठ्या पुलांना धोका निर्माण झाला आहे. रेती काढण्याच्या नादात माफियांनी पुलाच्या अगदी पायथ्याशी दहा ते पंधरा फुटांचे खड्डे खोदले आहे. त्यामुळे या पुलांवर औरंगाबाद जिल्ह्यातील घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच या पुलांची मुख्य अभियंत्यांकडून पाहणी होणार आहे. याशिवाय नवीन मोठ्या प्रस्तावित कामांचे नियोजन, प्रत्यक्ष भेटी, अवलोकन व आढावा या तीन दिवसीय दौऱ्यात पी.एस. मंडपे घेणार आहेत. (जिल्हा प्रतिनिधी )