शिवजयंतीनिमित्त छत्रपती महोत्सव
By Admin | Updated: February 13, 2016 02:13 IST2016-02-13T02:13:58+5:302016-02-13T02:13:58+5:30
सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीतर्फे दरवर्षी प्रमाणे यावर्षीसुद्धा १६ ते १९ फेब्रवारीपर्यंत शिवतीर्थ समता मैदान यवतमाळ येथे छत्रपती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

शिवजयंतीनिमित्त छत्रपती महोत्सव
यवतमाळ : सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीतर्फे दरवर्षी प्रमाणे यावर्षीसुद्धा १६ ते १९ फेब्रवारीपर्यंत शिवतीर्थ समता मैदान यवतमाळ येथे छत्रपती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात विद्यार्थी युवकांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध स्पर्धा घेण्यात येणार असल्याची माहिती शुक्रवारी पत्रपरिषदेत देण्यात आली.
मंगळवार १६ फेब्रुवारीला सकाळी ९ वाजता अमोलकचंद महाविद्यालय व वीर भगतसिंग विद्यार्थी परिषदेतर्फे वसंतराव नाईक सभागृहात अमोलकचंद महाविद्यालयात विदर्भस्तरीय आंतर महाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी ४ वाजता ‘बळीराजा जगाचा पोशिंदा’ या विषयावर फोटोग्राफी स्पर्धा, ५ वाजता समुह नृत्य स्पर्धा घेण्यात येईल.
सायंकाळी ६ वाजता छत्रपती महोत्सवाचे उद्घाटन होईल. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री संजय राठोड राहतील. उद्घाटक म्हणून नगराध्यक्ष सुभाष राय यांची उपस्थिती असेल. सायंकाळी ७.३० वाजता पुणे येथील प्रसिद्ध वक्त्या प्रतिमाताई परदेसी यांचे ‘छत्रपती शिवरायांची बदनामी एक षडयंत्र’ या विषयावर पहिले जाहीर व्याख्यान होणार आहे. व्याख्यानमालेचे अध्यक्ष म्हणून माजी शिक्षणमंत्री प्रा. वसंतराव पुरके हे राहतील.
बुधवारी सायंकाळी ६ वाजता एकलनृत्य स्पर्धा, ११ पारितोषिक विजेती, विद्रोही शाहीरी दोन अंकी नाटक ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ चे आयोजन करण्यात आले आहे. या सत्राचे अध्यक्ष विधानपरिषद सदस्य माणिकराव ठाकरे हे आहेत. गुरूवारी सायंकाळी ५ वाजता वेशभूषा स्पर्धा, ७ वाजता लेख गंगाधर बनबरे यांचे ‘छत्रपती शिवाजी महाराज आज असते तर’ या विषयावर व्याख्यान होईल. या सत्राच्या अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री संजय देशमुख तर प्रमुख उपस्थिती म्हणून खासदार भावना गवळी व आमदार ख्वाजा बेग हे राहतील. शुक्रवारी सकाळी ७ वाजता शिव मॅरॉथॉन स्पर्धा घेण्यात येईल. राज्यस्तरीय कराटे स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, रंगभरण स्पर्धा, चित्रकला स्पर्धा व रक्तदान शिबिर, दुपारी २ वाजता शोभायात्रा निघेल. त्यानंतर मुख्य शिवजयंती कार्यक्रम व बक्षीस वितरणाचा कार्यक्रम जीवन पाटील यांच्या अध्यक्षतेत होईल. या कार्यक्रमाला आमदार मदन येरावार यांची प्रमुख उपस्थिती राहील. निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांचे ‘अत्त दीप भव’ या विषयावर तिसरे व्याख्यान होईल. विविध क्षेत्रातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
२० फेब्रुवारीला स्त्री रोग व बाल रोग विभागास भेट व मदत, २१ ला पारधी बेड्यावर वैद्यकीय शिबिर व कपडे वाटप, २३ ला संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त व्यसनमुक्ती प्रबोधन व २४ फेब्रुवारीला मोफत नेत्रशस्त्रक्रिया शिबिर आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. स्वागताध्यक्ष म्हणून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल ठाकरे राहतील, अशी माहिती देण्यात आली. पत्रपरिषदेला मुख्य संयोजक तसेच मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. दिलीप महाले, सुदर्शन बेले, एजाज जोश, सुनील कडू, संतोष देशमुख, प्रा. प्रफुल्ल गुडदे व प्रशांत ठाकरे आदींची उपस्थिती होती. (सांस्कृतिक प्रतिनिधी)