रसायनयुक्त पाणी विदर्भा नदीत
By Admin | Updated: August 4, 2014 23:59 IST2014-08-04T23:59:42+5:302014-08-04T23:59:42+5:30
आहे़ या खाणींमधून कोळशाबरोबर निघणारे दूषित व रसायनयुक्त

रसायनयुक्त पाणी विदर्भा नदीत
वेकोलिची मनमानी : ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात
वणी : तालुक्यातील घोन्सा परिसरात वेकोलिच्या दोन कोळसा खाणी आहेत़ यात घोन्सा खुली खाण व कुंभारखणी भूमिगत कोळसा खाण आहे़ या खाणींमधून कोळशाबरोबर निघणारे दूषित व रसायनयुक्त पाणी सरळ परिसरातून वाहणाऱ्या विदर्भा नदीत सोडले जात आहे़
कुंभारखणी ही भूमिगत कोळसा खाण आहे़ या खाणीमधून कोळसा बाहेर काढताना त्यामधून निघणारे दूषित पाणी विदर्भा नदीत सोडले जात आहे. पूर्वी हे पाणी घोन्साजवळ असलेल्या एका शेतात शुध्दीकरण यंत्रातून शुध्द केल्यानंतर नदीत सोडले जात होते़ परंतु ते आता शुध्द न करताच काळे पाणी सरळ नदीत सोडले जात आहे़ त्यामुळे नदीतील संपूर्ण पाणी काळेभोर झाले आहे. वेकोलिच्या या मनमानी कारभाराला परिसरातील ग्रामस्थ चांगलेच कंटाळले आहे.
विदर्भा नदीतून परिसरातील घोन्सा, बोर्डा, साखरा (दरा) आदी गावांना पाणी पुरवठा होतो़ हे दूषित झालेले पाणीच सरळ नळावाटे बाहेर येत आहे. काही ठिकाणी तर नळाला अत्यंत काळे पाणी येते, अशी गावकऱ्यांची तक्रार आहे़ याविषयी गावकऱ्यांनी तक्रारीसुध्दा केल्या़ परंतु वेकोलिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही़ त्यामुळे सध्या परिसरातील जनतेचे आरोग्य धोक्यात सापडले आहे़
या दूषित पाण्यामुळे काही गावांमध्ये ग्रामस्थांना मळमळ, उलटी, हगवण यासारखे आजार वाढत आहे़ मानवी आरोग्याबरोबर जनावरांचेही आरोग्य धोक्यात सापडले आहे़ हे काळे पाणी जनावरांच्या शरीरात गेल्यास त्यांचे आरोग्य संकटात सापडण्याची भिती निर्माण झाली आहे़ या सर्व प्रकारामुळे मानव व जनावरांचे आरोग्य संकटात सापडले आहे. त्यावर तातडीने उपयायोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)