शेतमालाचे वजनकाटे तपासा
By Admin | Updated: October 28, 2015 02:40 IST2015-10-28T02:40:03+5:302015-10-28T02:40:03+5:30
मोठ्या प्रमाणावर शेतकरी सोयाबीन पीक विक्रीस आणत आहेत. काही दिवसात कापूसही विक्रीस येणार आहे.

शेतमालाचे वजनकाटे तपासा
पालकमंत्र्यांची सूचना : जिल्हा दक्षता व ग्राहक संरक्षण परिषदेची बैठक
यवतमाळ : मोठ्या प्रमाणावर शेतकरी सोयाबीन पीक विक्रीस आणत आहेत. काही दिवसात कापूसही विक्रीस येणार आहे. सोयाबीन, कापूस तोलाई करताना वजनकाट्यामध्ये शेतकऱ्यांची फसवणूक होऊ शकते. तशा तक्रारीही प्राप्त होत असतात. त्यामुळे याबाबत वजनमापे तपासणीची विशेष मोहीम जिल्हाभर राबवा, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी मंगळवारी दिले.
जिल्हा दक्षता व ग्राहक संरक्षण समितीचा आढावा पालकमंत्री राठोड यांनी बचत भवन येथे घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला खासदार भावना गवळी, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा पुरवठा अधिकारी राजेंद्र निफाडकर, वीज वितरणचे अधीक्षक अभियंता विजय भटकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी श्याम झोळ यांच्यासह ग्राहकांशी संबंधित विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
शेतकयांसह सामान्य ग्राहकांची फसवणूक होऊ नये, यासाठी वजनकाट्यांची नियमित तपासणी करण्यात यावी. तपासणीत सर्वच प्रकारच्या दुकानांचा समावेश असावा. सध्या सोयाबीन आणि कापसाचा हंगाम असल्याने ही पिके मोजणारी वजनमापे प्रामुख्याने मोहीम घेऊन तपासली जावी. मापांचे नुतनीकरण करताना संबंधिताना नुतनीकरण प्रमाणपत्र तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
येत्या काही दिवसावर दिवाळी सण आहे. सणासुदीच्या काळात खाद्य पदार्थांमध्ये विशेषत: दुग्धजन्य पदार्थात भेसळ होण्याची शक्यता असते. त्यामुळ हॉटेलसह अशा वस्तू विक्रेत्यांची नियमित तपासणी करावी. अलिकडे ठिकठिकाणी पाण्याची कॅनद्वारे विक्री होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यावेळी अनेकांनी सदर पाणी अशुध्द आणि अधिकृत नसल्याचे सांगितले. अशा विक्रेत्यांवर तातडीने तातडीने कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले.
आॅटोमध्ये मीटर बसविण्याबाबत पुन्हा बैठकीत चर्चा झाली. मागील बैठकीच्या सूचनेप्रमाणे मीटर तपासणी सुरू आहे. येत्या काही दिवसात संपूर्ण आॅटोमध्ये मीटर लागणे आवश्यक आहे. त्यासाठी पोलीस व परिवहन विभागाने विशेष मोहीम घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले. केरोसिनचा काळाबाजार होऊ नये, प्रत्येक महिन्यास प्रत्येक लाभार्थ्यास धान्याचा लाभ मिळाला पाहिजे, दूरध्वनी सेवेबाबत वारंवार येणाऱ्या तक्रारींवर तातडीने कार्यवाही करण्यासोबतच सदर सेवा नियमित कशी राहील, याकडे लक्ष देण्याचे निर्देशही त्यांनी दिले. (स्थानिक प्रतिनिधी)