आमच्या मुलांचा मोबाईल तपासून द्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 21:45 IST2017-08-25T21:44:58+5:302017-08-25T21:45:17+5:30
जिल्ह्याच्या खेड्यापाड्यांपर्यंत लहानमोठ्यांच्या हाती पोहोचलेल्या मोबाईलने आता स्वस्त इंटरनेटच्या माध्यमातून मानसिक स्वास्थ्याला सुरूंग लावला आहे.

आमच्या मुलांचा मोबाईल तपासून द्या !
अविनाश साबापुरे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्याच्या खेड्यापाड्यांपर्यंत लहानमोठ्यांच्या हाती पोहोचलेल्या मोबाईलने आता स्वस्त इंटरनेटच्या माध्यमातून मानसिक स्वास्थ्याला सुरूंग लावला आहे. तरुणाई दिवसाच्या एकूण तासापैकी झोपेचे ८ तास सोडले तर उरलेल्या वेळेपैकी तब्बल ८ तास मोबाईलवर एंगेज असते. शालेय मुले व मुलीही मोबाईलच्या अॅडिक्ट झाल्या आहेत. मुला-मुलींच्या मोबाईलला आईवडीलांनी हात लावला तरी मुलांना राग येतोय. त्यामुळे मुलांच्या मोबाईलमधील डाटा तपासण्यासाठी अनेक पालक कन्सल्टंटकडे धाव घेत आहेत.
मोबाईलची रिंग वाजो अथवा न वाजो, दर पाच मिनिटांनी मुले आपला मोबाईल चेक करतातच. यालाच मोबाईलचे व्यसन (अॅडिक्शन) म्हणतात. हे मानसिक आजाराचे लक्षण आहे. ब्लू व्हेल गेमच्या जाळ्यात अडकून मुले जीवाचे बरेवाईट करून घेत आहेत. मोठ्या शहरापर्यंत पोहोचलेला हा प्रकार आता यवतमाळसारख्या ग्रामीण परिसरातही पसरू पाहतोय. ब्लू व्हेल गेम नाही पण कॅण्डी क्रश, टेम्पल रन, सब वे सफर, तीन पत्ती अशा गेम्सने मुलांना विळखा घातला आहे. केवळ किशोरवयीन आणि तरुणच नव्हे तर प्रौढ अधिकारी, कर्मचारीही या गेम्सच्या नादात कार्यालयातही मोबाईलवर व्यस्त दिसतात. ही बाब सायबर तज्ज्ञांनी स्पष्ट केली आहे.
जिल्ह्यात इंटरनेट यूजर्स लाखोंच्या घरात असले तरी सायबर सुरक्षेच्या बाबतीत कोणीही सजग नाही. ६० टक्के मोबाईलधारकांना आपल्या अकाउंटची काळजी करण्याची गरजच वाटत नाही. तर ४० टक्के लोकांना काळजी वाटत असली तरी सुरक्षा कशी राखावी याचे मार्गच माहीत नाहीत. डिजिटल इंडियाचा नारा देणाºया शासनाची विविध कामे इंटरनेटद्वारे केली जातात. मात्र भल्या भल्या अधिकाºयांनाही त्यात गती नाही. खरे म्हणजे, विविध शासकीय कर्मचाºयांनासुद्धा सायबर सेक्युरिटी अवेअरनेस असणे गरजेचे आहे.
महाविद्यालयीन तरुणींचे खासगी फोटो तिच्या अकाउंटवरून चोरी होणे, फेसबुक किंवा ई-मेल अकाउंटच हॅक होणे असे प्रकार जिल्ह्यात घडत आहेत. काही प्रमाणात याद्वारे मुलींना त्रास होण्याचे प्रकारही घडत आहेत. पण योग्य मार्गदर्शनाअभावी पोलिसांपर्यंत तक्रारी केल्या जात नाही. तरुण मुलीच्या किंवा मुलाच्या मोबाईलला किंवा लॅपटॉपला पालकांनी हात लावला तरी मुलांना राग येतो. अशाच तक्रारी घेऊन शेकडो पालक सायबर सिक्युरिटी कन्सल्टंटकडे धाव घेत आहेत. तोपर्यंत मुला-मुलीचे ‘प्रकरण’ हाताबाहेर गेलेले असते. मुला-मुलींच्या मोबाईलमधील किंवा लॅपटॉपमधील डाटा जाणून घेण्यासाठी हे कन्सल्टंट पालकांना मदत करतात. नुकसान टाळण्यासाठी पालकांनी वेळीच काळजी घेण्याची गरज आहे.
मुले इंटरनेट युजर्स असली तरी बºयाच पालकांना त्यातले कळत नाही. म्हणून पालकांसाठी सपोर्ट सिस्टिम आवश्यक आहे. त्यासाठी आम्ही आतापर्यंत पालक जागृती अभियानाद्वारे सायबर अवेअरनेस सेमिनार घेतले आहे. शाळांनी पुढाकार घेतल्यास आम्ही खास पालकांसाठी ‘सायबर अवेअरनेस सेमिनार’ मोफत घेऊ. मुले-मुली इंटरनेटच्या आभासी जगात सफर करताना वाम मार्गाला लागू नये, यासाठी पालकांनी नेमके काय केले पाहिजे, याचे मार्गदर्शन केले जाईल. खरे तर पालकांपासून शासकीय कर्मचाºयांपर्यंत सर्वांनाच अशा अवेअरनेसची गरज आहे.
- अभिषेक वखरे,
सायबर सिक्युरिटी, यवतमाळ