परवानाधारक सावकारांची मालमत्ता, दस्तावेज तपासा
By Admin | Updated: October 26, 2016 00:42 IST2016-10-26T00:42:54+5:302016-10-26T00:42:54+5:30
जिल्हयात असलेल्या परवानाधारक सावकारांची मालमत्ता व त्यांच्या दस्तवेजांची तपासणी करा,

परवानाधारक सावकारांची मालमत्ता, दस्तावेज तपासा
सचिंद्र प्रताप सिंह : कोरे स्टँप,धनादेश सापडल्यास फौजदारी
यवतमाळ : जिल्हयात असलेल्या परवानाधारक सावकारांची मालमत्ता व त्यांच्या दस्तवेजांची तपासणी करा, तसेच वैध, अवैध सावकारांच्या आलेल्या तक्रारीवर छापासत्र राबवावे, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल भवणात झालेल्या बैठकीत जिल्हा उपनिबंधक गौतम वर्धन यांना दिले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले व सर्व तालुक्यांचे सहायक निबंधक उपस्थित होते.
जिल्हाधिकारी पुढे म्हणाले, छाप्यामध्ये जर कोर स्टँप पेपर, धनादेश सापडल्यास त्यांच्यावर तातडीने नवीन महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ मधील तरतुदीनुसार गुन्हे दाखल करण्यात यावे. जिल्हयात परवानाधारक सावकारांची संख्या ही १०८ असून या सावकारांचे रजिस्टर, परवाना, कुटुंबातील सदस्यांची शेती, ७/१२, त्यांच्याकडे जमीन वडीलोपार्जित वारसाने हक्काने आली की खरेदी करण्यात आली, घरातील सदस्यांच्या नावावर असलेली जमीन, इतरांकडून खरेदी करण्यात आलेली जमीन, गहान वस्तुंच्या पावत्या, खाते पुस्तिका, दागिणे यांच्यावर छापासत्र टाकून तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यांच्याकडे असलेल्या जमीनीची माहिती तहसीलदार व दुय्यम निबंधक यांच्याकडून घेण्याचे आदेश देण्यात आले. ज्या प्रकरणात तक्रार होऊन सावकारांनी तडजोड करीत शेतकऱ्यांच्या जमीनी परत केल्या वा करीत आहे. म्हणजेच त्यांच्या अवैद्य सावकारी निदर्शनात येत असल्याने त्यांच्यावरही गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
जिल्हयात अवैध सावकारीचे १८९ तक्रारी आल्या असून १२२ प्रकरणांची चौकशी पूर्ण झालेली आहे. ६७ प्रकरणांची चौकशी सूरू असून यातील ५ अवैध सावकारांवर गुन्हे दाखल झाल्याचे जिल्हा उपनिबंधक गौतम वर्धन यांनी बैठकीत सांगितले. तसेच इतर प्रकरणात अवैध सावकारी सिध्द होत असल्यास गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी अवैध सावकारी करणारे शासकीय कर्मचारी असल्यास त्यांच्यावर प्रचलित कायद्यातील तरतुदीनुसार व सावकारी कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करावी, परवानाधारक सावकारांनी व्यवसायाच्या ठिकाणी दर्शनी भागात नाव, गाव पत्ता आणि व्याजदर अशा माहितीचे फलक लावले की नाही याची तपासणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले.
शासनाच्या या धडक कारवाईमुळे जिल्ह्यातील अवैध सावकारांचे धंदे बंद होणार असून सावकारग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. (प्रतिनिधी)
सावकारग्रस्त शेतकऱ्यांना तक्रार करण्याचे आवाहन
जिल्हयातील सावकारग्रस्तांकडून पिळवणूक होत असेल तर अशा शेतकऱ्यांनी आपल्या तक्रारी सहायक निबंधक, जिल्हा उपनिबंधक यांच्या कार्यालयाकडे कराव्या, असे आवाहन जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी शेतकऱ्यांना केले आहे.