यवतमाळ : जिल्हा बँक अध्यक्षांचे स्वाक्षरी करून ठेवलेले तीन धनादेश त्यांच्या खासगी कार्यालयाच्या ड्रॉवरमधून चोरून नेले. लोणी येथीलच एक तरुण येथील मार्इंदे चौकातील स्टेट बँकेत धनादेश वठविण्यास गेला असता व्यवस्थापकाच्या सतर्कतेने हा प्रकार उघडकीस आला. पिंटू राऊत रा. लोणी, असे धनादेश चोरणाऱ्या संशयित तरुणाचे नाव आहे. तीन ते चार दिवसांपूर्वी जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील यांच्या आर्णी मार्गावरील खासगी कार्यालयातून हे धनादेश चोरीला गेले. दरम्यान, बुधवारी हे धनादेश येथील स्टेट बँकेत वठविण्यासाठी एक तरुण घेवून आला. यावेळी व्यवस्थापकांना शंका आल्याने त्यांनी मनीष पाटील यांना कॉल करून आपल्या खात्याचे प्रत्येकी दोन लाख, एक लाख आणि एक लाख, असे चार लाखांच्या रकमेचे धनादेश वठविण्यासाठी पिंटू राऊत नामक तरुण आल्याचे सांगितले. मनीष पाटील यांनी चेकबुकची पाहणी केली तेव्हा मधातील तीन धनादेश बेपत्ता असल्याचे आढळून आले. त्यांनी तत्काळ स्टेट बँक गाठून पिंटू राऊत याला धनादेशासह ताब्यात घेतले. तसेच वडगाव रोड पोलीस ठाणे गाठून संशयित पिंटू राऊत याला पोलिसांच्या स्वाधीन करून तक्रार दिल्याचे जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. वृत्तलिहिस्तोवर याप्रकरणी गुन्हा दाखल झाला नव्हता. (स्थानिक प्रतिनिधी)
जिल्हा बँक अध्यक्षांचे धनादेश चोरी
By admin | Updated: December 24, 2014 23:07 IST