शासकीय कार्यालयांना दलालांचा विळखा
By Admin | Updated: March 7, 2016 02:24 IST2016-03-07T02:24:59+5:302016-03-07T02:24:59+5:30
शासन सर्वसामान्य जनतेसाठी विविध योजना राबविते. या योजनांची माहिती सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासकीय यंत्रणा कार्यरत असते.

शासकीय कार्यालयांना दलालांचा विळखा
उमरखेड : शासन सर्वसामान्य जनतेसाठी विविध योजना राबविते. या योजनांची माहिती सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासकीय यंत्रणा कार्यरत असते. परंतु सध्या उमरखेड तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांना दलालांचा विळखा पडला असून काही लोकांनाच योजनांचा लाभ मिळत आहे. खरे लाभार्थी यापासून वंचित राहत आहे. तर काही ठिकाणी मंजुरीच्या नावाखाली सर्वसामान्यांची लूट केली जात आहे. काही अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तर खासगी एजंटच नियुक्त केले आहे.
घरकुल योजना, शिधा पत्रिका, विधवा पेंशन योजना, अपंग वेतन, वृद्धांसाठी निराधार योजना, पंचायत समिती व कृषी विभागातून मिळणारे साहित्य, तहसील कार्यालय यासह अनेक विभागाच्यावतीने विविध योजना राबविल्या जातात. या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी शहरासह ग्रामीण भागात एजंटांचे प्रस्थ वाढले आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिक शहरात येतात. परंतु शासकीय कार्यालयात त्यांचा थांगपत्ता लागत नाही. अशा वेळी एजंट फायदा घेतात. विविध योजना मिळवून देण्याचे आमिष दिले जाते. शेतकऱ्यांनादेखील सवलतीच्या दरात साहित्य मिळवून देण्याचे आमिष देऊन मोठी रक्कम लुबाडून घेतात.
विधवा महिला अनेक वर्षांपासून पेंशन योजनेपासून वंचित आहे. या शिवाय अनेक वृद्धांनाही निर्वाह भत्ता दिला जात नाही. शासन नियुक्त कर्मचारी याकडे कानाडोळा करीत असल्याचे दिसत आहे. अशा परिस्थितीत दलाल या नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढून त्यांच्याकडून पैसे वसूल करतात. विशेष म्हणजे थेट काम घेऊन गेल्यास आठ ते दहा दिवस लागतात. मात्र दलालांच्या माध्यमातून तेच काम अवघ्या काही तासात केले जाते.
या सर्व प्रकारात योजनांचा मात्र बोजवारा उडाला आहे. (शहर प्रतिनिधी)