आवक वाढल्याने लाल मिरची स्वस्त
By Admin | Updated: April 10, 2017 02:01 IST2017-04-10T02:01:42+5:302017-04-10T02:01:42+5:30
उन्हाळा सुरू झाला की घराघरात धान्य साठवणुकीला प्रारंभ होते. विशेषत: पापड, लोणची तयार करण्याची धावपळही सुरू असते.

आवक वाढल्याने लाल मिरची स्वस्त
ग्राहक समाधानी : किलोमागे ५० ते ७० रुपयांची घट, खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी
पुसद : उन्हाळा सुरू झाला की घराघरात धान्य साठवणुकीला प्रारंभ होते. विशेषत: पापड, लोणची तयार करण्याची धावपळही सुरू असते. अलीकडे लाल मिरच्या साठवून ठेवण्यात येतात. सध्या बाजारात लाल मिरच्यांची आवक वाढल्याने मिरचीचे दर किलोमागे ५० ते ७० रुपयाने उतरले आहे. परिणामी साठवणूक करणाऱ्यांची मिरची खरेदीसाठी गर्दी झाली आहे.
पावसाळ्यातील चार महिन्यांसाठी तिखटाची सोय करून ठेवण्यासाठी गृहिणींची सध्या धांदल उडाली आहे. यावर्षी मिरचीचे उत्पादन वाढल्याने आवक चांगली झाली आहे. पाच महिन्यांपूर्वी आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये बॅडगी मिरचीचा क्विंटलचा भाव २२ हजार ते २२ हजार ५०० रुपये होता. याच मिरचीचा भाव आता आठ ते बारा हजार रुपयांपर्यंत खाली आला आहे. जानेवारीपासून दर उतरू लागले आहेत. दरातील ही घसरण कायम आहे. गुंटूर मिरची आंध्र प्रदेशची असून या मिरचीला आॅक्टोबर-नोव्हेंबरमध्ये १३ ते १३ हजार ५०० हजार रुपये भाव होता. सध्याचा दर चार हजार ते पाच हजार ५०० रुपये झाला आहे. तेजा मिरचीचा भाव सध्या आठ हजार ५०० रुपये असून सहा महिन्यांपूर्वी १२ हजार ते १३ हजार रुपये होता. मिरचीसाठी लागणाऱ्या मसाल्यांनाही चांगली मागणी आहे. किरकोळ बाजारात तुरीचा दर ६० ते ६५ रुपये, तर हरभरा डाळ ६० ते ७० रुपयांपर्यंत स्थिर आहे. डाळीचे उत्पादन पाहता आगामी काळात किलो मागे दोन ते तीन रुपये घसरण होईल, असा व्यापाऱ्यांचा अंदाज आहे. दर उतरल्याने लाल मिरची खरेदी करण्याची धांदल सध्या बाजारात दिसून येत आहे. (तालुका प्रतिनिधी)