स्वस्त धान्य दुकानदाराकडून ग्राहकांची दिशाभूल
By Admin | Updated: February 23, 2015 00:15 IST2015-02-23T00:15:14+5:302015-02-23T00:15:14+5:30
यवतमाळ तालुक्यातील काही रास्त भाव दुकानदारांकडून ग्राहकांची दिशाभूल केली जात आहे. धान्याच्या सबसिडीचा लाभ घेण्यासाठी ठरावीक बँकेत खाते ...

स्वस्त धान्य दुकानदाराकडून ग्राहकांची दिशाभूल
हिवरी : यवतमाळ तालुक्यातील काही रास्त भाव दुकानदारांकडून ग्राहकांची दिशाभूल केली जात आहे. धान्याच्या सबसिडीचा लाभ घेण्यासाठी ठरावीक बँकेत खाते उघडण्याचा आग्रह केला जात आहे. विशेष म्हणजे धान्याच्या सबसिडीबाबत शासनस्तरावरून अद्याप कोणतेही धोरण निश्चित झालेले नाही. त्याउपर आगाऊ सूचना देऊन रास्त भाव धान्य दुकानदारांकडून सर्वसामान्य ग्राहकांना नाहक त्रास देण्यात येत आहे.
रास्त धान्य घेण्यासाठी दुकानात आलेल्या ग्राहकांना परवानाधारकांकडून आगाऊच्या सूचना दिल्या जात आहे. गॅस सिलींडरप्रमाणे धान्याचीही सबसीडी बँक खात्यात जमा केली जाईल, अशी बतावणी करून आधारकार्डशी जोडलेले बँक खाते उघडण्याचा सल्ला दिला जात आहे. याबाबत मात्र शासनस्तरावरून कोणताही आदेश नसताना नसती उठाठेव सुरू आहे. लाभार्थ्यांना आधारकार्डाची झेरॉक्स, एक फोटो, राशनकार्डची झेरॉक्स आणि राष्ट्रीयकृत बँकेचे खाते असलेल्या बँक पुस्तकाची झेरॉक्स मागितल्या जात आहे.
सध्या शासनाकडून अंत्योदयच्या लाभार्थ्यांना दोन रुपये किलोप्रमाणे महिन्याकाठी १३ किलो गहू तर तीन रुपये किलोप्रमाणे १० किलो तांदूळ देण्यात येतात. बीपीएल कार्डधारकांना कुटुंबातील प्रती व्यक्ती दोन रुपये किलोप्रमाणे दोन किलो तांदुळ तर तीन रुपये किलोप्रमाणे तीन किलो गहू दिला जातो. प्रती कार्डधारकांना एक लिटर केरोसिन देण्यात येत आहे. या सर्वबाबींचा विचार केल्यानंतर शासनाकडून किती सबसिडी जमा केली जाणार आणि ही सबसिडी काढण्यासाठी बँकेत जाणे परवडणारे नाही. बऱ्याच ठिकाणी शासनाच्या अनुदानापेक्षा प्रवासाचा खर्च अधिक लागणार आहे. याबाबत अद्याप कुठलेही धोरण ठरलेले नाही. केवळ रास्त भाव दुकानदारांकडून चर्चा घडून आणली जात आहे. त्यातही एका विशिष्ट बँकेतच खाते काढण्याचा आग्रह लाभार्थ्यांना केला जात आहे. याकडे तालुका पुरवठा विभागाने लक्ष घालण्याची गरज आहे. (वार्ताहर)