नगरपरिषदेच्या शाळा प्रभारींवर

By Admin | Updated: August 1, 2014 00:29 IST2014-08-01T00:29:12+5:302014-08-01T00:29:12+5:30

येथील नगरपरिषदेच्या ११ शाळांपैकी एकाही शाळेत अधिकृत मुख्याध्यापक नाही़ सर्वच्या सर्व शाळा प्रभारी मुख्याध्यापकांच्या भरवशावर सुरू आहे़ मात्र नगरपरिषदेची शाळा समिती याकडे लक्ष द्यायला तयार नाही़

In charge of the Municipal Council | नगरपरिषदेच्या शाळा प्रभारींवर

नगरपरिषदेच्या शाळा प्रभारींवर

वणी : येथील नगरपरिषदेच्या ११ शाळांपैकी एकाही शाळेत अधिकृत मुख्याध्यापक नाही़ सर्वच्या सर्व शाळा प्रभारी मुख्याध्यापकांच्या भरवशावर सुरू आहे़ मात्र नगरपरिषदेची शाळा समिती याकडे लक्ष द्यायला तयार नाही़ शिक्षणासारख्या गंभीर बाबीवरसुध्दा नगरपरिषद उदासीन असल्याने नगरपरिषदेच्या कार्यप्रणालीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे़
शहरात नगरपरिषदेच्या ११ प्राथमिक शाळा सुरू आहेत़ यात एक हिंदी व एका ऊर्दू शाळेचाही समावेश आहे़ शहरात केवळ तीनच खासगी प्राथमिक शाळा असल्याने प्राथमिक शिक्षणाचा संपूर्ण भार नगरपरिषदेच्या शाळांवर आहे़ सर्वच शाळेत पुरेसे विद्यार्र्थीही आहे़ विद्यार्थ्यांच्या प्रमाणात शिक्षकांची संख्यादेखील आहे़ मात्र अलीकडे इंग्रजी शाळांचे प्रस्थ वाढल्याने या मराठी शाळांकडील विद्यार्थ्यांचा कल कमी झाल्याने मराठी शाळा तुटतील की काय, अशी भिती व्यक्त होत आहे़ त्यासाठी मराठी शाळांना स्पर्धेत उतरण्याची गरज आहे़
खासगी इंग्रजी शाळांसोबत स्पर्धा करण्यासाठी नगरपरिषद शाळांना सक्षम मुख्याध्यापकाची आवश्यकता आहे़ परंतु नगरपरिषदेच्या एकाही शाळेत मुख्याध्यापक नाहीत़ अकराही शाळांमध्ये प्रभारी मुख्याध्यापक कारभार सांभाळत आहे़ नगरपरिषदेच्या इतिहासात अशी वेळ येण्याची ही पहिलीच वेळ आहे़ कार्यरत सेवाज्येष्ठ शिक्षकांना बढती देऊन मुख्याध्यापकांची पदे भरण्याचा नियम आहे़ परंतु त्यासाठी आरक्षणानुसार बढती द्यावी लागते़ नियुक्ती व बढतीची बिंदू नामावली आयुक्त (मागासवर्गीय) अमरावती यांच्याकडून प्रमाणीत करून घ्यावी लागते़ मात्र नगरपरिषदेने अजूनही बिंदू नामावली मंजूर करून घेतली नाही़ त्यामुळे मुख्याध्यापकांच्या पदोन्नती रखडल्या आहे़
येथील नगरपरिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी नसल्याने जबाबदारीने काम करायला कोणी तयार नाही़ शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी व शिक्षण समितीसुध्दा या बाबीविषयी गंभीर दिसत नाही़ शिक्षण समितीची वर्षभरात एकही सभासुध्दा झाली नसल्याची माहिती आहे. शिक्षणासारख्या बाबींवर विचार करायची तसदी शिक्षण समितीने न घेतल्याने समितीचे कार्य तरी कोणते, हे समजायला मार्गच उरला नाही़ (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: In charge of the Municipal Council

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.