ज्येष्ठ शिक्षकांना डावलून कनिष्ठांना प्रभार
By Admin | Updated: January 12, 2017 00:51 IST2017-01-12T00:51:31+5:302017-01-12T00:51:31+5:30
जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये ज्येष्ठांना डावलून कनिष्ठ शिक्षकांना मुख्याध्यापक पदाचा प्रभार देण्यात आला.

ज्येष्ठ शिक्षकांना डावलून कनिष्ठांना प्रभार
मुख्याध्यापक पद : जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे दुर्लक्ष, संकेत तुडविले पायदळी
यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांमध्ये ज्येष्ठांना डावलून कनिष्ठ शिक्षकांना मुख्याध्यापक पदाचा प्रभार देण्यात आला. शिक्षण विभागाच्या दुर्लक्षामुळे सर्वत्र हीच स्थिती दिसून येत आहे.
जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत तब्बल २१०१ शाळा आहेत. या शाळांमध्ये आठ हजारांच्या आसपास शिक्षक कार्यरत आहेत. काही शाळांमध्ये उच्चश्रेणी मुख्याध्यापकांची पदे मंजूर आहेत. मात्र अनेक शाळांमध्ये मुख्याध्यापकांची पदेच नाहीत. अशा शाळांमध्ये तेथे कार्यरत ज्येष्ठ शिक्षकाकडे मुख्याध्यापक पदाचा प्रभार देण्यात येतो. बहुतांश शाळांमध्ये हाच संकेत पाळण्यात येतो. मात्र काही शाळांमध्ये कनिष्ठ शिक्षकांना मुख्याध्यापक पदाचा प्रभार देण्यात आल्याचे शिक्षकांकडून सांगण्यात येते.
संबंधित पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख यांच्याशी साटेलोटे करून काही शाळांमधील ज्येष्ठ शिक्षक कनिष्ठ शिक्षकांना मुख्याध्यापक पदाची जबाबदारी सोपवित आहेत. कनिष्ठांनी प्रभार घेण्यास असमर्थता दर्शविल्यास त्यांना कारवाईचा इशारा दिला जातो. वास्तविक बीईओंनी कनिष्ठांकडे प्रभार देण्याचा आदेश देणेच संसंगत नाही. तथापि कारवाईचा धाक दाखवित काही पंचायत समित्यांचे बीईओ, विस्तार अधिकारी अधिकाराचा दुरूपयोग करीत कनिष्ठांना मुख्याध्यापक पदाचा प्रभार घेण्यास बाध्य करीत असल्याची चर्चा आहे.
बीईओ, विस्तार अधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे अनेक कनिष्ठ शिक्षक त्रस्त झाले आहेत. त्यांनी ज्येष्ठ शिक्षकांकडेच मुख्याध्यापक पदाचा प्रभार ठेवावा, असे स्पष्ट केले आहे. मात्र उलट त्यांनाच पत्र देऊन प्रभार घेण्यास सांगितले जात आहे. प्रभार न घेतल्यास कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी भीती शिक्षकांना सतावत आहे. (शहर प्रतिनिधी)