जिल्हा परिषदेत बदल्यांचा घोडेबाजार
By Admin | Updated: May 13, 2014 00:11 IST2014-05-13T00:11:46+5:302014-05-13T00:11:46+5:30
जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे अजूनही बदलीपात्र शिक्षकांची आकडेवारी उपलब्ध नाही. कोणाच्या प्रशासकीय बदल्या होणार हे निश्चित नसल्याने घोडेबाजार

जिल्हा परिषदेत बदल्यांचा घोडेबाजार
यवतमाळ : जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडे अजूनही बदलीपात्र शिक्षकांची आकडेवारी उपलब्ध नाही. कोणाच्या प्रशासकीय बदल्या होणार हे निश्चित नसल्याने घोडेबाजार करण्यासाठी येथे आयतीच संधी चालून आली आहे. पारदर्शकेतेसाठी राबविल्या जाणार्या समुपदेशन प्रक्रियेचाही बोजवारा उडण्याची चिन्हे आहेत. बदलीसाठी जिल्हा परिषदेत १७ ते २३ मे दरम्यान समुपदेशन प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यापूर्वीच बदलीपात्र शिक्षकांची यादी प्रसिध्द करून त्यावर आक्षेप घेण्याची संधी देणे आवश्यक आहे. मात्र केवळ पाच दिवसांचा अवधी शिल्लक असताना किती शिक्षकांची बदली करणार याचा अधिकृत आकडा शिक्षण विभागाकडे नाही. अशीच स्थिती वित्त विभागाची आहे. या विभागातील बदलीपात्र कर्मचार्यांचा अजूनही ताळमेळ जुळलेला नाही. बदली प्रक्रिया नेहमीच घाई गडबडीत राबवून मोठय़ा प्रमाणात घोडेबाजार केला जातो. हा नित्याचा अनुभव आहे. ज्या कर्मचार्यांची आíथक स्थिती नाही, राजकीय वशिला नाही, अशा कर्मचार्यांवरच या प्रक्रियेमध्ये अन्याय होतो. नियमही त्यांच्याचसाठी लावले जातात. तर बदलीनंतरही काही कर्मचारी सेटिंग लावून प्रतिनियुक्ती घेऊन आपली मूळ आस्थापना सोडण्यास तयार नसतात. अशा दीडशेवर कर्मचार्यांचा कित्येक वर्षांपासून मुख्यालयीच डेरा आहे. सामान्य प्रशासन, पशुसंवर्धन, बांधकाम -एक, सिंचन, पाणीपुरवठा, महिला बालकल्याण विभागाने बदली पात्र कर्मचार्यांची यादी प्रसिध्द केली आहे. आक्षेप दाखल करण्यासाठी कर्मचार्यांना किमान पाच दिवसांचा अवधी मिळणार आहे. याउलट स्थिती शिक्षण आणि वित्त विभागाची आहे. समुपदेशनाची प्रक्रिया १७ मे पासून राबविली जाणार आहे. पशुसंवर्धन आणि कृषी विभागाचे समुपदेशन १८ मे रोजी, सामान्य प्रशासन आणि पंचायत विभागाचे १९ ला, प्राथमिक शिक्षण विभागाचे २0, २१, २३ या सलग तीन दिवस समुपदेशन चालणार आहे. त्यानंतर २३ मे रोजी आरोग्यच्या कर्मचार्यांचे समुपदेशन केले जाणार आहे. (कार्यालय प्रतिनिधी)