जिल्हा परिषदेत बदल्यांचा हंगाम
By Admin | Updated: May 10, 2014 02:30 IST2014-05-10T00:30:41+5:302014-05-10T02:30:17+5:30
जिल्हा पषिदेतील वर्ग तीन आणि चारच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचा हंगाम सुरू होणार आहे. एप्रिल २०१३ मध्ये ग्रामविकास विभागाने दिलेल्या ....

जिल्हा परिषदेत बदल्यांचा हंगाम
यवतमाळ : जिल्हा पषिदेतील वर्ग तीन आणि चारच्या कर्मचार्यांच्या बदल्यांचा हंगाम सुरू होणार आहे. एप्रिल २०१३ मध्ये ग्रामविकास विभागाने दिलेल्या निर्देशानुसार बदली प्रक्रिया राबविली जाणार आहे. यामुळे अधिकार्यांसोबतच पदाधिकार्यांच्याही हालचाली वाढल्याचे दिसत आहे. अनेकांसाठी हा सुगीचा काळ असतो. प्रत्येक जण आपआपल्यापरीने ही प्रक्रिया ‘कॅश’ करण्यासाठी धडपडतो. पंचायत विभाग, सामान्य प्रशासन, बांधकाम विभाग, शिक्षण विभाग, पाणी पूरवठा विभाग, कृषी, आरोग्य, महिला बालकल्याण विभागातील वर्ग तीन आणि चारच्या कर्मचार्यांच्या बदल्या केल्या जाणार आहे. यासाठी सर्व विभागाने बदली पात्र कर्मचार्यांची यादी तयार करण्यास सुरूवात केली आहे. सामान्य प्रशासन आणि पंचायत विभागातील बदली पात्र कर्मचार्यांची यादी प्रसिध्द केली जाणार आहे. याप्रमाणेच इतरही विभाग बदलीस पात्र कर्मचार्यांची आक्षेपासाठी यादी जाहीर करणार आहे. ९ ते १५ मे दरम्यान आक्षेप घेता येणार आहे. या आक्षेपावर १५ मे रोजी सुनावणी करून अंतिम यादी प्रसिध्द होईल. त्यानंतर १७ ते २३ मे दरम्यान समुपदेशनाने बदली प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. प्रत्यक्ष स्क्रिनवर रिक्त जागा पाहुन कर्मचार्यांना बदली आदेश देण्यात येणार आहे. ही प्रक्रिया पारदर्शक करण्यसाठी प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे. या प्रक्रियेत शक्यतो तक्रार कर्त्यांची संख्या कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. कर्मचार्यांच्या अडचणी येथे निकाली काढून प्रक्रिया अधिक सोयीस्कर करण्यावर भर दिला जाणार आहे. कर्मचार्यांनी कोणत्याही भुलथापाना बळी पडू नये, असे आवहनही करण्यात आले आहे. मात्र यापूर्वीचा अनुभव पाहता बदलीच्या हंगामात होणार घोडेबाजार थांबविण्याचे आव्हान राहणार आहे. जिल्हास्तरावरच्या बदल्या झाल्यानंतर लगेच २६ ते ३१ मे दरम्यान पंचायत समितीस्तरावरची बदली प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. प्रत्येक पंचायत समितीस्तरावरून पात्र कर्मचार्यांची यादी प्रसिध्द करून आक्षेपाच्या सुनावणी नंतर समुपदेशनानेच बदली करणार आहेत. बदल्याच्या हंगमामुळे ‘कही खुशी कही गम’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. अनेक कर्मचारी धास्तावलेले आहेत. तर काहींनी सोयीचे ठिकाण मिळविण्याची संधी आल्याने ‘सेटींग’ लावणे सुरू केले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)