अनुसूचित जाती, जमातीच्या जात प्रमाणपत्रात बदल
By Admin | Updated: November 20, 2014 23:00 IST2014-11-20T23:00:58+5:302014-11-20T23:00:58+5:30
शासनाने अनुसूचित जाती, जमातीमधील नागरिकांच्या जात प्रमाणपत्रामध्ये बदल केल्याने या प्रवर्गातील नागरिकांना परत पुन्हा नवीन जात प्रमाणपत्र काढावे लागणार आहे़ त्यामुळे नागरिकांना

अनुसूचित जाती, जमातीच्या जात प्रमाणपत्रात बदल
नागरिकांना त्रास : पडताळणीसाठी येरझारा, सर्वांनाच आर्थिक भुर्दंड
गणेश रांगणकर - नांदेपेरा
शासनाने अनुसूचित जाती, जमातीमधील नागरिकांच्या जात प्रमाणपत्रामध्ये बदल केल्याने या प्रवर्गातील नागरिकांना परत पुन्हा नवीन जात प्रमाणपत्र काढावे लागणार आहे़ त्यामुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे.
शासनाने प्राथमिक शिक्षण घेत असलेल्या अनुसूचित जाती, जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना लागू केली आहे़ त्यासोबतच भूमिहीन शेतमजुरांच्या पाल्यांसाठी ‘आम आदमी विमा’ योजना सुरू केली आहे़ या योजनेचा लाभ घेण्याकरिता संबंधित विद्यार्थ्याला जात प्रमाणपत्र काढणे आवश्यक असल्याची जाचक अट आहे. त्यामुळे या प्रवर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी जात प्रमाणपत्र काढले आहे़ या प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी सदर जात प्रमाणपत्र देऊन योजनेचा लाभही घेतला आहे़
विज्ञान शाखेत शिकणाऱ्या, तसेच उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळविताना जात वैधता प्रमाणपत्र मागितले जाते़ त्यासाठी विज्ञान शाखेत व्यावसायीक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी आपल्या महाविद्यालयामार्फत जुनेच जात प्रमाणपत्र जोडून अमरावती येथील विभागीय जात पडताळणी कार्यालयाकडे पडताळणी प्रस्ताव पाठविले आहे़ काही विद्यार्थ्यांनी जुन्याच जात प्रमाणपत्रावर नोकरीसुध्दा मिळविली आहे़ ज्यांनी नोकरी मिळविली, त्यांनासुध्दा आत जात वैधता प्रमाणत्र मागितले जात आहे़
आता मात्र अनुसूचित जाती, जमातीच्या जात प्रमाणपत्रात शासनाने बदल केला आहे. त्यामुळे या प्रवर्गात्ील सर्वांना नवीन जात प्रमाणपत्र काढावे लागणार आहे़ परिणामी या प्रवर्गाील नागरिक आणि विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंडासह नाहक त्रासालाही सामोरे जावे लागत आहे़ तथापि शासनाने याबाबत कोणतेही शुध्दीपत्रकही काढले नाही़ केवळ मंत्रालयातील सचिवांचे पत्र पुढे करून नवीन जात प्रमाणपत्र प्रत्येक तहसील कार्यालयातून दिले जात आहे़ मात्र या प्रवर्गातील नागरिकांना याबाबत कोणतीही कल्पना नाही़ जे विद्यार्थी, नोकरदार आपले जुने जात प्रमाणपत्र घेऊन अमरावती येथील जात पडताळणी समिती कार्यालयात प्रस्ताव घेऊन जात आहे, त्यांना आता नवीन जात प्रमाणपत्र काढून ते जोडून प्रस्ताव सादर करण्यास सांगितले जात आहे. शासनाच्या वेळोवेळी बदलणाऱ्या अशा निर्णयांमुळे या प्रवर्गात्ील नागरिक आणि विद्यार्थ्यांना मात्र नाहक प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे़
पडताळणी जिल्हा ठिकाणी करावी
विभागीय जात पडताळणी समितीचे कार्यालय अमरावती येथे आहे. वणीपासून हे ठिकाण किमान २०० किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे अमरावती येथे येण्या-जाण्याच्या प्रवासातच विद्यार्थ्यांचा वेळ निघून जातो़ त्याचबरोबर समितीचाही भोंगळ कारभार असल्याने दोन-चारदा चकरा माराव्या लागतात़ त्यामुळे त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. जात पडताळणी समिती कार्यालय जिल्ह्याच्या ठिकाणी उपलब्ध करून द्यावे, अशी नागरिकांची मागणी आहे़