पंचरंगी लढतीने निवडणुकीत प्रचंड चुरस

By Admin | Updated: October 9, 2014 23:09 IST2014-10-09T23:09:55+5:302014-10-09T23:09:55+5:30

वणी विधानसभा मतदार संघात पंचरंगी लढतीने निवडणुकीत चांगलीच चुरस वाढली आहे. उमेदवारांची दमछाक अन् कार्यकर्त्यांची आता सत्व परीक्षा आहे.

Champion elections | पंचरंगी लढतीने निवडणुकीत प्रचंड चुरस

पंचरंगी लढतीने निवडणुकीत प्रचंड चुरस

वणी : वणी विधानसभा मतदार संघात पंचरंगी लढतीने निवडणुकीत चांगलीच चुरस वाढली आहे. उमेदवारांची दमछाक अन् कार्यकर्त्यांची आता सत्व परीक्षा आहे.
कॉंग्रेस, सेना, राष्ट्रवादी, भाजप आणि मनहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तगडे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. याशिवाय डावी आघाडी, बसपा, गोंगपा आणि अपक्ष उमेदवारही रणांगणात कायम आहेत. एकूण १३ उमेदवारांमध्ये लढत होत आहे. मात्र खरी लढत पाच प्रमुख पक्षांच्या उमेदवारांमध्येच होत आहे. त्यामुळे या पाचही उमेदवारांनी प्रचारासाठी धावपळ सुरू केली आहे. गावोगावी, खेडोपाडी पोहोचून उमेदवार मते मागताना दिसत आहे.
उमेदवारांचा दिवस दररोज पहाटेच सुरु होत आहे. दिवस उगविल्यानंतर त्यांचे प्रचार कार्य सुरू होते. रात्री २ ते ३ वाजतापर्यंत ते गावोगावी जातात. त्यामुळे गेल्या आठ दिवसांपासून त्यांची चांगलीच झोपमोड झाली आहे. त्यातच प्रतिस्पर्धी उमेदवारांची एमकेकांना धास्ती असल्याने सर्वच उमेदवार रात्रीचा दिवस करीत आहेत. प्रचारासाठी आता अवघे चार दिवस शिल्लक असल्याने त्यांची तारांबळ उडत आहे. उमेदवारांसोबतच त्यांच्या सच्चा कार्यकर्त्यांचीही झोपमोड झाली आहे. मात्र असे कार्यकर्ते बहुतांश पक्षांजवळ फारच कमी आहे. केवळ मनसेकडे अशा कार्यकर्त्यांची फौज तयार आहे.
सर्वच पक्षांना कार्यकर्त्यांची कमतरता जाणवत आहे. काही पक्षांनी तर रोजंदारीवर कार्यकर्त्यांना प्रचारात जुंपले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील काही बेरोजगार युवकांना रोजगार प्राप्त झाला आहे. त्यातही शेतीच्या मजुरीपेक्षा जादा मजुरी मिळत असल्याने त्यांना सुगीचे दिवस आले आहेत. त्यांची चांगलीच चंगळ होत आहे. मात्र मनस्वी कार्यकर्ते नसल्याने या उसण्या कार्यकर्त्यांच्या भरवशावर विजय कसा मिळवावा, असा प्रश्न काही उमेदवारांना पडला आहे. खरे कार्यकर्ते बोटावर मोजण्याइतपत असल्याने त्यांची बोबडी वळली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)

Web Title: Champion elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.