राष्ट्रवादीच्या उमेदवारापुढे शहरी मतदारांचे आव्हान

By Admin | Updated: November 13, 2016 00:24 IST2016-11-13T00:24:38+5:302016-11-13T00:24:38+5:30

पुसद नगरपरिषद अध्यक्षपदाची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेससाठी आणि विशेषत: ज्येष्ठ नेते आमदार मनोहरराव नाईक

Challenge of urban voters before NCP candidate | राष्ट्रवादीच्या उमेदवारापुढे शहरी मतदारांचे आव्हान

राष्ट्रवादीच्या उमेदवारापुढे शहरी मतदारांचे आव्हान

पुसद नगराध्यक्ष : काँग्रेसचा मराठा तर युतीचा उच्चशिक्षित उमेदवार
पुसद : पुसद नगरपरिषद अध्यक्षपदाची निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेससाठी आणि विशेषत: ज्येष्ठ नेते आमदार मनोहरराव नाईक यांच्यासाठी प्रतिष्ठेची ठरणार आहे. कारण त्यांच्या सौभाग्यवती अनिताताई नाईक नगराध्यक्षपदाच्या उमेदवार असून राष्ट्रवादी-नाईकांपुढे शहरी मतदारांना आपल्याकडे वळविण्याचे आव्हान राहणार आहे.
पुसदचे नगराध्यक्षपद इतर मागासवर्गीय प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने येथे साहित्यिक-कवयित्री अनिताताई मनोहरराव नाईक यांना रिंगणात उतरविले आहे. काँग्रेसने मराठा मतदारांची संख्या आणि एक मराठा-लाख मराठा आंदोलन डोळ्यापुढे ठेवून शुभांगी प्रकाश पानपट्टे यांना उमेदवारी दिली. भाजप-शिवसेना युतीने उच्चशिक्षित डॉ.अर्चना अश्विन जयस्वाल यांना नगराध्यक्षपदाचे तिकीट दिले आहे. अडचणीचे ठरू पाहणाऱ्या एमआयएमच्या उमेदवाराचा विड्रॉल करून घेण्यात राष्ट्रवादीने यश मिळविल्याचे मानले जाते.
राष्ट्रवादीचे अनेक प्लस पॉर्इंट आहेत. त्या बळावर राष्ट्रवादीला ही निवडणूक सहज सोपी वाटत असली तरी विरोधकही भक्कम असल्याने प्रत्यक्षात तेवढी सोपी निवडणूक राहिलेली नसल्याचे जाणकारांचे मत आहे. राष्ट्रवादीला विजयासाठी चांगलाच जोर लावावा लागणार आहे. अनिताताई यांच्याबाबत असलेली सहानुभूती राष्ट्रवादीच्या फायद्याची ठरू शकते. पुसदचा विचार केल्यास राष्ट्रवादीची ग्रामीण भागावर चांगली पकड आहे. मात्र शहरात तशी स्थिती नाही. विधानसभा निवडणुकीत अनेकदा ही बाब सिद्ध झाली आहे. शहरात राष्ट्रवादीला फारच फार एक-दोन हजारांचा लिड राहिला आहे. प्रत्येकवेळी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी राहात असल्याने विधानसभेत कट्टर अल्पसंख्यकांची मते नाईकांच्या पारड्यात पडतात. परंतु गेल्या विधानसभेत काँग्रेस, राष्ट्रवादी वेगवेगळे लढल्याने अल्पसंख्यकांची मते काँग्रेसकडे अधिक प्रमाणात गेली होती. नगराध्यक्षपदासाठीही काँग्रेस-राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात लढत असल्याने यावेळीसुद्धा अल्पसंख्यकांची मते काँग्रेसला मोठ्या प्रमाणात मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. काँग्रेसने अल्पसंख्यकांची अधिक मते आपल्याकडे ओढल्यास राष्ट्रवादीला त्याचा मोठा फटका बसू शकतो.
शहरी मतदारांवर भाजपाची पकड असते. भाजपा-शिवसेना युतीमध्ये लढत असल्याने या उमेदवाराला दुहेरी फायदा होवू शकतो. १४ प्रभागातील २९ जागांसाठी होवू घातलेल्या या निवडणुकीत मतदारांची संख्या ६५ हजार एवढी आहे.
२८ सदस्यीय पुसद नगरपरिषदमध्ये सध्या राष्ट्रवादीचे १२, काँग्रेसचे १०, सेनेचे चार व भाजपाचे दोन सदस्य आहेत. हे संख्याबळ पाहता काँग्रेस पक्ष हा अगदी राष्ट्रवादीच्या मागेच असल्याचे दिसून येते. यावेळी नेमके काय चित्र राहील, हे २८ नोव्हेंबरनंतरच स्पष्ट होणार आहे. यावेळी अनेक वर्षानंतर पहिल्यांदाच थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार असल्याने त्याला ‘मिनी आमदारकी’चे स्वरूप प्राप्त झाले आहे. (लोकमत चमू)

निलय नाईकांच्या भाजपा प्रवेशाचाही फटका बसणार
नाईक घराण्यातील महत्त्वाचे सदस्य अ‍ॅड.निलय नाईक यांनी नुकताच भाजपात प्रवेश केला आहे. त्यांच्या या भाजपा प्रवेशाचे नुकसान राष्ट्रवादीच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदाच्या उमेदवारांना होण्याची शक्यता आहे. बंजारा समाजातील उच्चशिक्षितांचा कल नेहमीच निलय नाईकांकडे राहिला आहे. पुसदमध्ये राष्ट्रवादीने काय केले, असा सवाल या उच्चशिक्षितांकडून नेहमीच विचारला जातो. निलय नाईकांचा फायदा यावेळी पुसदमध्ये भाजप-सेनेच्या उमेदवारांना होवू शकतो. पुसदमधील उच्चवर्णीय समाजाची मते राष्ट्रवादीच्या विरोधात जात असल्याचा अनुभव आहे. या सर्व बाबी पाहता राष्ट्रवादीला नगराध्यक्षपदाची निवडणूक तेवढी सोपी नाही, विजयासाठी शहरी मतदारांमध्ये चांगलाच जोर लावावा लागेल, असे राजकीय गोटात मानले जाते.

Web Title: Challenge of urban voters before NCP candidate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.