जिल्हा परिषद शाळांपुढे गुणवत्ता वाढीचे आव्हान
By Admin | Updated: May 13, 2015 02:14 IST2015-05-13T02:14:28+5:302015-05-13T02:14:28+5:30
आजचे युग स्पर्धेचे आहे. शाळांमध्येही ही स्पर्धा वाढली आहे. विद्यार्थी मिळविण्यासाठी शाळांमध्ये चढाओढ सुरू आहे.

जिल्हा परिषद शाळांपुढे गुणवत्ता वाढीचे आव्हान
नेर : आजचे युग स्पर्धेचे आहे. शाळांमध्येही ही स्पर्धा वाढली आहे. विद्यार्थी मिळविण्यासाठी शाळांमध्ये चढाओढ सुरू आहे. मात्र यात जिल्हा परिषदेच्या शाळा मागे पडल्या आहेत. ढासळलेली गुणवत्ता हे यामागील कारण आहे. सरकारी शाळेच्या शिक्षणात निर्माण झालेली घसरण लक्षात घेता ग्रामीण विद्यार्थ्यांचा ओढा खासगी शाळांकडे वाढला आहे. परिणामी जिल्हा परिषदेच्या शाळा ओस पडण्याच्या मार्गावर आहे.
स्पर्धेत ग्रामीण असो की शहरी विद्यार्थी त्याला स्पर्धेतून जावे लागते. पण, जिल्हा परिषदेच्या शाळांवर कार्यरत शिक्षकांमध्ये मात्र या स्पर्धेचा कुठलाही परिणाम होताना दिसत नाही. शाळेवर उशिरा पोहोचणे, मुख्यालयी न राहणे, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी कुठलेही प्रयत्न न होणे या बाबी शिक्षकांमध्ये दिसून येतात. एकूणच तालुक्यात शिक्षणाचा खेळखंडोबा सुरू आहे. कुठलाही पालक या शाळांमध्ये आपल्या पाल्याला टाकायला तयार नाही.
पाल्य शिकला पाहिजे यासाठी अर्धपोटी राहून त्याला चांगल्या शाळेत घालण्याची तयारी पालकांची आहे. कारण जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या चौथीच्या विद्यार्थ्याला स्वत:चे नावही धड लिहिता येत नाही. शिक्षकांना राजकारणामध्येच जास्त रस आहे. ही परिस्थिती बदलण्याचे आव्हान जिल्हा परिषदेपुढे आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळांचे शिक्षक कार्यरत ठिकाणापासून ४० किलोमीटर अंतरावर तालुका अथवा जिल्हा मुख्यालयापासून दुचाकीने ये-जा करतात. या प्रवासात ते शारीरिकदृष्ट्या थकून जातात. अशावेळी त्यांची विद्यार्थ्यांना शिकविण्याची काय मानसिकता असेल याचाही विचार होणे गरजेचे आहे. जिल्हा परिषद प्रशासनाचा या शिक्षकांवर कुठलाही वचक राहिलेला नाही. जवळपास शिक्षक सोयीच्या ठिकाणावरून ये-जा करतात.
दुसरीकडे काही खासगी शाळांनी नावलौकिक कमविला आहे. चांगला निकाल देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. अशा शाळांकडे पालकांचा ओढा अधिक आहे. खासगी शाळांना जे जमले ते जिल्हा परिषदेच्या शाळांना का नाही, असा प्रश्न पालकांमधून उपस्थित केला जात आहे. खासगी शाळांचे शिक्षक मुख्यालयी राहतात. शाळेचा दर्जा, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी अतिरिक्त वर्ग घेतात. असे प्रयत्न जिल्हा परिषदेकडून व्हावे, अशी अपेक्षा पालकांकडून व्यक्त होत आहे. (तालुका प्रतिनिधी)