बॅग सेंटर फोडून पोलिसांना आव्हान
By Admin | Updated: October 7, 2016 02:32 IST2016-10-07T02:32:33+5:302016-10-07T02:32:33+5:30
शहर पोलीस हाकेच्या अंतरावर असलेल्या येथील पाचकंदील चौकातील पूजा बॅग सेंटरच्या गोदामाचे शटर वाकवून ९२ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला.

बॅग सेंटर फोडून पोलिसांना आव्हान
९२ हजारांचा मुद्देमाल : सीसीटीव्ही लंपास, ठाण्यासमोरील घटना
यवतमाळ : शहर पोलीस हाकेच्या अंतरावर असलेल्या येथील पाचकंदील चौकातील पूजा बॅग सेंटरच्या गोदामाचे शटर वाकवून ९२ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. ही घटना गुरुवारी सकाळी ८ वाजताच्या समारास उघडकीस आली.
पाचकंदील चौक ते टांगा चौक या मार्गावर पूजा बॅग सेंटर दुकान आहे. त्या दुकाना खालीच गोदाम आहे. चोरट्यांनी रात्रीदरम्यान या गोदामाचे शटर वाकवून आत प्रवेश केला. तेथील रोख ७२ हजार ५०० रुपये आणि इतर मुद्देमाल अशी ९२ हजार ८५० रुपयांची चोरी केली. विशेष म्हणजे शहर ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर हे घटनास्थळ आहे. सातत्याने बाजारपेठेत दुकान फोडीच्या घटना होत आहे. नवरात्रोत्सव असल्याने पहाटेपर्यंत रस्त्यांवर वर्दळ असते. शिवाय पोलिसांचा बंदोबस्तही असतो. अशाही स्थितीत चोरट्यांनी शहर पोलिसांच्या नाकावर टिच्चून दुकान फोडले. चोरटे इतक्यावरच थांबले नाही तर त्यांनी गोदामात लागलेले सीसीटीव्ही कॅमेरे, डीव्हीआर कापून नेला. या प्रकरणी अशोक लक्ष्मणदास नागवाणी यांच्या तक्रारीवरुन शहर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ( कार्यालय प्रतिनिधी)
व्यापाऱ्यांत भीतीचे सावट
यापूर्वी चोरट्यांनी सरदार चौकात दुकान फोडले होते. दत्त चौक परिसरातील सीटी सेंटरमध्ये एकाच रात्री चार दुकाने फोडण्याची घटना घडली होती. चोरट्यांनी बाजारपेठेतील दुकानांनाच टार्गेट केल्यामुळे व्यापारी वर्गात भीती निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात दुकान फोडीचे सत्रच सुरू झाले आहे. पोलिसांना मात्र एकाही घटनेतील आरोपींचा सुगावा लागलेला नाही.