मार्चपूर्वी निधी खर्चाचे आव्हान
By Admin | Updated: March 4, 2017 00:51 IST2017-03-04T00:51:23+5:302017-03-04T00:51:23+5:30
जिल्हा परिषदेसमोर येत्या ३१ मार्चपूर्वी प्राप्त निधी खर्च करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

मार्चपूर्वी निधी खर्चाचे आव्हान
कोट्यवधींचा निधी : नवीन पदाधिकाऱ्यांना फटका
यवतमाळ : जिल्हा परिषदेसमोर येत्या ३१ मार्चपूर्वी प्राप्त निधी खर्च करण्याचे आव्हान उभे ठाकले आहे. या निधीतून नवीन पदाधिकारी, सदस्यांना विकास कामे करता येणे शक्य नसल्याने त्यांना फटका बसणार आहे.
नवीन पदाधिकारी सत्तारूढ होण्यास अद्याप तीन आठवड्यांचा अवधी आहे. तोपर्यंत मार्च महिन्याची ३१ तारीख उजाडणार आहे. तत्पूर्वीच जिल्हा परिषदेला प्राप्त निधी खर्च करावा लागणार आहे. यापैकी काही निधी शासनाकडे प्रस्ताव पाठवून नव्याने मंजुरी घेऊन पुढील वर्षात खर्ची घालता येणार आहे. मात्र बहुतांश निधी ३१ मार्चपूर्वीच खर्च करणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. नुकतीच मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या संदर्भात विभाग प्रमुख व तालुकस्तरीय प्रमुखांची बैठक घेऊन सुरू असलेली कामे तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले.
एकट्या बांधकाम विभागाकडे अद्याप दोन कोटी रूपये पडून आहेत. यातून काही कामे सुरू आहे. आचारसंहिता लागू असल्याने काही कामे रखडली होती. आता या कामांनी पुन्हा वेग घेतला आहे. २०१६-१७ मध्ये या विभागाला दोन कोटी ३० लाख ४१ हजारांचा निधी मिळाला होता. या निधीतून कामांचे नियोजन करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात अनेक कामे रखडली होती. आता मार्चचा धसका घेऊन कामांना गती देण्यात आली. ही कामे मार्चपूर्वी पूर्ण करण्याची धडपड सुरू आहे.
मागील वर्षी प्राप्त निधीतून नवीन पदाधिकारी, सदस्यांना मात्र कोणतेही काम सुचविणे अशक्य आहे. त्यांना आता पुढील वर्षी प्राप्त निधीतूनच आपल्या मतदार संघातील विकास कामांना चालना देता येणार आहे. अर्थात किमान वर्षभर नवीन पदाधिकारी, सदस्यांना मतदार संघातील विकास कामे पूर्ण होण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. एप्रिल महिन्यात प्राप्त निधीतूनच त्यांना विकास कामे सुचवता येणार आहे. त्यामुळे नवीन पदाधिकारी, सदस्यांचा अपेक्षाभंग होण्याची शक्यता आहे. (शहर प्रतिनिधी)