पाटणबोरी येथे चक्काजाम
By Admin | Updated: May 6, 2016 02:24 IST2016-05-06T02:24:13+5:302016-05-06T02:24:13+5:30
गेल्या दोन महिन्यांपासून महावितरणच्या भोंगळ कारभाराने त्रस्त झालेल्या संतप्त पिंपळखुटीवासीयांनी गुरूवारी येथील महावितरण कार्यालयावर धडक दिली.

पाटणबोरी येथे चक्काजाम
महावितरणविरूद्ध रोष : पिंपळखुटीवासीय धडकले कार्यालयावर
पाटणबोरी : गेल्या दोन महिन्यांपासून महावितरणच्या भोंगळ कारभाराने त्रस्त झालेल्या संतप्त पिंपळखुटीवासीयांनी गुरूवारी येथील महावितरण कार्यालयावर धडक दिली. दुचाकी रस्त्यावर आडवी लावून ग्रामस्थांनी चक्काजाम आंदोलन केले.
गेल्या दोन महिन्यापासून तेलंगणा सेमेवरील पिंपळखुटी येथील नागरिक महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे मेटाकुटीस आले आहे. याबाबत त्यांनी महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांसमोर अनेकदा समस्या मांडल्या. मात्र ग्राहकांच्या समस्यांचे कोणतेही देणेघेणे नसलेल्या महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कोणतेही पाऊल उचलले नाही. शेवटी त्रस्त झालेल्या ५० ग्रामस्थांनी गुरूवारी येथील महावितरण कार्यालयाच्या विरोधात घोषणाबाजी केली. दुचाकींना रस्त्यावर आडवी लावून पाटणबोरी मुख्य रस्त्यावर चक्काजाम आंदोलन सुरू केले. यानंतर ग्रामस्थांनी महावितरणच्या भटकर व राठोड या कर्मचाऱ्यांना घेराव घातला. सकाळी ११ वाजतापर्यंत येथील कनिष्ठ अभियंता वैशाली बुरांडे आल्या नव्हत्या. त्यांच्याशी संपर्क साधला असता, साहित्याबाबतची गरज वरिष्ठांना कळविली असून अद्याप साहित्य आले नाही. त्यात आमची काय चूक आहे, असे त्यांनी सांगितले.
पिंपळखुटी येथे महावितरणचा भोंगळ कारभार असून विजेचे तार अनेकांच्या घरावर पडले आहे. तेथील डीपीचे कोणतीही देखभाल होत नसून डीपी उघड्या अवस्थेत आहे. उच्च-कमी दाबाच्या वीज पुरवठ्यामुळे नऊ जणांचे दूरचित्रवाणी संच, १६ कुलर व चार फ्रिज आत्तापर्यंत जळाले आहे. विजेच्या समस्येने नागरिक वैतागून गेल्याने त्यांनी महावितरणवर धडक दिली. या आंदोलनात गजानन पुल्लेवार, लसमन्ना कोरेड्डीवार, आशन्ना पुंड्रावार, प्रमोद रासमवार, महेंद्र रासमवार, अशोक रासमवार, गोपाल कोरेड्डीवार आदींसह ग्रामस्थ सहभागी झाले होते. (वार्ताहर)