एसटी बस चालकावर चाकूहल्ला
By Admin | Updated: June 26, 2017 00:47 IST2017-06-26T00:47:19+5:302017-06-26T00:47:19+5:30
साईड देण्याच्या क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादात एका एसटी बस चालकावर चाकूहल्ला करण्याची घटना

एसटी बस चालकावर चाकूहल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : साईड देण्याच्या क्षुल्लक कारणावरुन झालेल्या वादात एका एसटी बस चालकावर चाकूहल्ला करण्याची घटना येथील बसस्थानक परिसरात रविवारी दुपारी घडली.
सुभाष मोतीराम मुरमुरे (३५) रा. किन्ही ता. यवतमाळ असे जखमी बस चालकाचे नाव आहे. रविवारी ड्युटी संपल्यानंतर सुभाष आपल्या दुचाकीने घरी जाण्यासाठी निघाले. मित्र भेटल्याने पानटपरीवर उभे होते. त्याच वेळी दुचाकीवरून आलेल्या दोन तरुणांनी साईड दे म्हणत शिवीगाळ सुरू केली. त्यांना समजाविण्याचा प्रयत्न केला असता पाच ते सहा जण गोळा झाले. त्यातील एकाने चाकू काढून मुरमुरे यांच्या पार्श्वभागावर चाकूने वार केला. रक्तबंबाळ होऊन सुभाष खाली कोसळले. काही कळायच्या आत टोळके तेथून पसार झाले. जखमी चालकाला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून वृत्तलिहिस्तोवर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.